महाराष्ट्र

विद्यार्थ्यामध्ये शिस्त पाहिजे असेल तर सहकार्य करा….. मुख्याध्यापक अमोल फुले.

टाइम्स 9 मराठी प्रतिनिधी तात्या साहेब काटकर

अकलूज: समाज, परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्तीचे प्रमाण वाढत आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी व विद्यार्थीस शिस्त लावण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन सदाशिवराव माने विद्यालय अकलूजचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले. शाळा दोन पावले पुढे येत असेल तर पालकांनीही एक पाऊल पुढे टाकावे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची अनेक नवी माध्यमे सध्या खुणावत आहेत, मात्र त्यातील चांगले काय घ्यायचे, कोणत्या दिशने प्रगती करायची, याचे संस्कार पालक व शिक्षकच घडवू शकतात. 

सोलापूर जिल्ह्यातील एक नंबर असलेली शाळा म्हणजे सदाशिवराव माने विद्यालय अकलूज. या विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शिक्षक पालक व माता पालक संघ स्थापन करण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेची सुरवात विद्येची देवता सरस्वती व सोलापूर जिल्ह्यचे भाग्यविधाते स. म. शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक झाकीर सय्यद यांनी केले. प्रास्ताविकात संघ का स्थापन करायचा, शासनाचा जी. आर, संघाची कर्तव्य यासंदर्भात माहिती दिली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत शिक्षक आणि पालकांचा एकत्र संवाद झाला, तर त्या विद्यार्थ्यातील हिऱ्याला चांगल्या प्रकारे पैलू पाडता येऊ शकतात. याच हेतूने शाळांमध्ये पालक-शिक्षक संघ स्थापन करून पालक सभा घेण्याचे बंधन सरकारने घातले. तसेच या संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे अशी माहिती विद्यालयाचे उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी दिली त्या बरोबरच वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली. उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख संजय शिंदे यांनी शाळेतील उपक्रम व स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. तसेच विद्यालयातील विविध शिष्यवृत्ती परीक्षा, शाळाबाह्य परीक्षा, गेल्या वर्षीचा इयत्ता १० वी, १२ वी निकाल पालकांना सांगीतला. अनेक पालकांना आपल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे मिळाल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आम्हाला अभिमान आहे आमचा पाल्य स. मा. वी शिकत असल्याचा असेही मत मांडले.

सभेस एक ते दीड हजार पालक उपस्थित होते. त्याचबरोबर पर्यवेक्षक उमेश बोरावके, राजेंद्र धोत्रे, रावसाहेब मगर, आसिफ झारेकरी, उमेश भिंगे यांनी आपापल्या विभागाची माहिती सांगितली. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक, पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले तर आभार राजश्री करांडे मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button