शहर

अकलूज नगरपरिषद झाली, बॉडी बसली,पण सिग्नल कधी सुरू होणार?

​प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचा जीव धोक्यात,सामान्य जनतेचा संतप्त सवाल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​अकलूज : अकलूज- परिसराचे हृदय असलेल्या अकलूज शहराचे रूपांतर आता नगरपरिषदेत झाले आहे. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी आपल्या पदाचा कार्यभारही स्वीकारला आहे. मात्र, शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना, शहरातील अत्यंत महत्त्वाचे असलेले ट्रॅफिक सिग्नल अजूनही ‘कोमात’ आहेत. हे सिग्नल नेमके कधी सुरू होणार? असा संतप्त सवाल आता अकलूजमधील सामान्य जनता विचारत आहे.

​शहरात अनेक नामवंत शाळा आणि महाविद्यालये आहेत. दररोज हजारो विद्यार्थी या चौकांमधून ये-जा करतात. सिग्नल बंद असल्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी आणि बेशिस्त वाहतूक पाहायला मिळते. यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. “एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?” असा जळजळीत प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

​अकलूजमधील मुख्य चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था असूनही ती केवळ शोभेची वस्तू बनली आहे. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, वाहतूक कोंडीमुळे तासनतास वेळ वाया जात आहे. नगरपरिषदेची नवीन बॉडी सत्तेवर आल्यानंतर तरी या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र सध्या तरी निराशाच पदरी पडली आहे.

​”नगरपरिषद स्थापन होऊन लोकप्रतिनिधी सत्तेवर आले आहेत, आता तरी त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे. केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष सिग्नल सुरू करून वाहतूक शिस्तबद्ध करावी.” — अकलूजमधील एक त्रस्त नागरिक

​शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे सिग्नल तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. आता अकलूज नगरपरिषदेचे नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की जनतेला अजून काही काळ याच अराजकतेत राहावे लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button