महाराष्ट्र

इंदापूर पोलीसांनी सरडेवाडी टोल नाका येथे ७० लाखांचा २४० किलो गांजा पकडला.दोन आरोपींसह क्रेटा गाडी ताब्यात घेतली. धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी

इंदापूर पोलीसांनी सरडेवाडी टोल नाका येथे कारवाई करत तब्बल २४० किलो गांजा पकडला आहे. विषाखपट्टनम येथून पुणे कडे जाणाऱ्या हुंदाई कंपनीच्या क्रेटा कार मध्ये गांजा घेऊन जाताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय खबरीवरुन सदर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये दोघांना पोलीसांनी अटक केली असून रूपेश दिलीप जाधव रा. वृंदावन पार्क, कसबा, ता. बारामती आणि सुनिल तुळशीदास वेदपाठक रा. वाघज रोड, देवळे पार्क बारामती ता. बारामती जि.पुणे अशी आरोपींची नांवे आहेत. त्यांच्यावर इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २० (२) (क), २९ भादवि क ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका क्रेटा कार मध्ये गांजा घेऊन जात असल्याची टीप इंदापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पोलीस पथकाने ०९ फेब्रुवारी रोजी रात्री ०८ वाजताच्या दरम्यान सरडेवाडी टोलनाका येथे सापळा लावला. यावेळी सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने एक हुंदाई कंपनीची क्रेटा कार नं. MH 42 A 5656 ही पोलीसांना संशयास्पद वाटली.
पोलीसांनी त्या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले. पोलीसांनी कारमधील दोघांना गाडीची डिक्की उघडुन पाहीली असता डिक्कीमध्ये व मधल्या सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण १२० पॅकेट्स मिळून आले. यामध्ये पोलीसांना कॅनावियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा ६० लाख रुपये किमतीचा एकुण २४० किलो ओलसर गांजा मिळून आला. व १० लाख रुपये किमतीची कार ताब्यात घेण्यात आली.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उप विभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स. पो. निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, हवालदार बालगुडे, पोलीस लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले, शिधाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे व विकास राखुंडे, विक्रम जमादार यांच्या पथकाने केली. पुढील अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button