संपादकीय

आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय सदस्य निवडीबाबत पुन्हा ये रे माझ्या मागल्या, केवळ राजकारणासाठी आदिनाथचा उपयोग झाला : पाटील गटाकडून नाराजी व्यक्त

करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय सदस्य निवडीबाबत पुन्हा ये रे माझ्या मागल्या, केवळ राजकारणासाठी आदिनाथचा उपयोग झाल्याचे सांगुन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय सदस्यपदी विलासराव घुमरे, डाॅ.वसंत पुंडे आणि दिपक देशमुख यांच्या निवडी झाल्या आहेत. याबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आपले स्पष्ट मत मांडले.यावेळी ते म्हणाले की आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करुन या निवडी झाल्या आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज जो काही अडचणीत आला आहे यास कारणीभूत ठरलेल्या गटातील व्यक्ती जर का प्रशासकीय सदस्य म्हणून निवडला जात असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. गेली अनेक वर्षे आदिनाथ कारखान्याच्या सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठी करुन मनमानी कारभार केल्याने आदिनाथ अडचणीत आला आहे. आदिनाथ कारखाना चुकीच्या पध्दतीने चालवत असताना पडद्याआडून निर्णयावर अंतिम मोहोर उमटवणारा सुत्रधार कोण होता हे सभासद जाणुन आहेत. कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांच्या अथक आणि भगिरथ प्रयत्नांमुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागातुन आदिनाथ कारखाना उभारला गेला. यास सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी साथ दिली. यामुळे मग आदिनाथ वाचवण्यासाठी किंवा आदिनाथ कारखान्यास संकटातुन बाहेर काढण्यासाठी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी प्रयत्न केले आणि यापुढेही करत राहणार आहेत. पाटील गटात अनेक आजी माजी संचालक आहेत. त्यांना सहकारातील दांडगा अनूभव आहे. विशेष म्हणजे पाटील गटातील एकाही पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. असे असताना माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना विचारात न घेता आणि पाटील गटास डावलून जर या निवडी होत असतील तर ही बाब आम्हा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारी अशी आहे. ज्यांनी कठीण काळात मोहिते-पाटील यांच्या पाठीमागे उभारण्याचे काम केले त्यांना जर निवडीच्या वेळेस बाजूला ठेवले जात असेल तर मग जिल्ह्यातील इतर समर्थक कार्यकर्त्यांना खरेच तुम्ही न्याय द्याल यावर शंका उपस्थित होईल. या उलट मोहिते-पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान देऊन सुरुंग लावण्याची सुरुवात कोणी केली ? त्यावेळी तालूकाभर सभा घेऊन मोहिते-पाटील हे तालूक्याबाहेरचे आहेत असे कोण सांगत होते ? मोहिते-पाटील यांचा पराभव‌ करणारच असा निश्चय करून शेंडीला गाठ मारणारे चाणक्य कोण ? संपुर्ण महाराष्ट्रात मोहिते-पाटील यांच्या पराभवाचे पडसाद त्यावेळी उमटले असताना त्यास कारणीभूत असलेली व्यक्ती जर का आज आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय सदस्यपदी शिफारस देऊन निवडली जात असेल तर मग मोहिते-पाटील यांच्या मागे सावली सारख्या राहणाऱ्या पाटील गटावर झालेला हा अन्याय आहे. आदिनाथ कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या नावावर भरमसाठ कर्ज काढून कोणाचे राजकीय विस्तारिकरण झाले हे संपूर्ण तालूक्याला ठाऊक आहे. आदिनाथ कारखाना हा पाटील कुटूंबासाठी आस्थेचा विषय आहे. पद असो वा नसो, आदिनाथवर सत्ता असो वा नसो, आदिनाथ कारखान्यास संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे झटत राहणार आहेत. आदिनाथ आज संक्रमण काळात असुन अशावेळी जर केवळ राजकारणासाठी कोणी याचा उपयोग करत असेल तर ही बाब सहकाराला सकस वातावरण निर्माण करुन देणारी नाही. जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या बद्दल कायम आदर ठेऊन माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी आजपर्यंत राजकारण केले. संपुर्ण पाटील गटाने मोहिते-पाटील कुटूंबाचा कायम सन्मान राखला. परंतु ७२ हजार मतांचा जनाधार असलेल्या पाटील गटास बाजूला ठेऊन जर अशाप्रकारे  तालूक्यातील संस्थेचा वापर कोणाला तरी खुश करण्यासाठी होत असेल‌ तर आजवर पाटील गटाच्या नेतृत्वाने आपल्यावर ठेवलेल्या राजकीय निष्ठेचे काय ? मागील काही महिन्यापुर्वी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आदिनाथ कारखान्यास संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यास माजी आमदार नारायण (आबा) पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि बागल गटाचे प्रतिनिधी हजर होते. यामुळे आदिनाथवर प्रशासकीय सदस्य नेमताना जगताप व पाटील गटास विचारात घेतले गेले पाहिजे होते.पाटील गटात सहकाराचे ज्ञान, अनुभव आणि विशेष म्हणजे आदिनाथ बद्दल आस्था असणारे अनेक कार्यकर्ते आहेत. यामुळे सदर शिफारस देताना त्यांची नावे आठवली नाहीत का ? केवळ विलासराव घूमरे, डाॅ. वसंत पुंडे, महेंद्र पाटील आणि दिपक देशमुख अशी चारच नावे सदर पत्रामध्ये नमुद होती. यातील तीन नावांचा विचार झाला. या चारही नावांची शिफारस करत असताना पाटील गटासोबत कसलीही चर्चा झाली नाही हे समस्त सभासदांना समजणे गरजेचे आहे. प्रशासकीय सदस्य यांची मुदत केवळ सहा महिनेच असते आज ना उद्या या निवडी सुध्दा बदलाव्या लागतील. पण आजमितीस पाटील गटातील कार्यकर्त्यांच्या भावना मात्र या निवड प्रक्रियेमुळे दुखावल्या असल्याचे सांगून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. सहकारी गट म्हणुन काम करत असताना पाटील गटास विचारात घेऊन प्रशासकीय सदस्यांच्या निवडी होणे गरजेचे होते इतरांच्या कडून आम्ही अशी अपेक्षा धरली नाही, परंतू मोहिते-पाटील नेतृत्वाकडून खुप अपेक्षा होत्या. पाटील गट कार्यक्षम असून आदिनाथ कारखाना हा या गटाचे श्रध्दास्थान असलेल्या कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांनी उभारला आहे. आदिनाथ बाबत राजकारण झाले याची खंत वाटते असे तळेकर यांनी आवर्जून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button