वंचित ~राष्ट्रवादी एकत्री करणाचे गूढ?

ऍड अविनाश टी काले , अकलूज
डॉ आंबेडकर चौक , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213
रविवार दिनांक 23एप्रिल 2023रोजी नाशिक येथे निवृत्त न्यायमूर्ती अनिल जी वैद्य , आणि भटक्या विमुक्त चळवळीचे नेते तुकाराम माने साहेब यांच्या सह अनेक चळवळीतील कार्यकर्ते यांची बैठक पार पडली , ज्यात राजकारणात सक्रिय नसलेले परंतु कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी निर्माण केलेल्या विद्यार्थी हॉटेलचे व्यवस्थापन पाहणारे त्यांचे नातू कुणाल जी गायकवाड साहेब अश्या समवेत बैठक पार पडली , त्यात मूळ विषय हा होता की एस सी , एस टी , कुमकुवत ओबीसी , अल्पसंख्यांक वर्गाचे अर्थकारण , उद्योग व्यवसाय कसे गतिमान करता येतील व त्या साठीची व्यवस्था निर्माण करणे ,
त्या नंतर आम्ही माजी न्यायमूर्ती यांचे घरी गेलो , आणि हे करत असतानाच आजच्या राजकीय परिस्थिती वर , ही चर्चा झाली , व आपण ग्रुप म्हणून कोणती राजकीय भूमिका घ्यावी ? या संबंधाने ही चर्चा केली अर्थात ही चर्चा सुध्दा भाजपा किंवा हिंदुत्व वादी राजकारण रोखणे यावरच होती आणि आपली जी क्षमता असेल त्या प्रमाणे आपण समर्पित होऊन जाऊ असा निर्णय झाला
दुसरे दिवशी सकाळी मी कळवा सोडले आणि अकलूज कडे येण्यासाठी निघालो , वाटेत मोबाईलवर बातमी झळकली , शरदचंद्र जी पवार साहेब आणि ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांची यशवंतराव चव्हाण सभागृहात भेट झाली आणि ते एकत्रित येण्याची शक्यता आहे टिन पाट पत्रकाराची ही बातमी असेल म्हणून मी दुर्लक्ष केले , परंतु त्या नंतर मात्र अनेक मान्यवर न्यूज चॅनल वर ती बातमी पाहिली , तेंव्हा ते सत्य आहे हे उमगले त्या नंतर स्वतः शरदचंद्र जी पवार साहेब यांनी ही भेट झाल्याचे कबूल केले आणि , कर्नाटक मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत , जिथे राष्ट्रवादी काँग्रेस वंचित चे विरोधात नसेल तिथे वंचित ने सहकार्य करायचे व जिथे वंचित चां उमेदवार राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात नसतील तेथे राष्ट्रवादी काँग्रेस ने वंचित ला सहकार्य करायचे , असा निर्णय झाला
राष्ट्रवादी काँग्रेस ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निर्माण करण्यासाठी याची गरज आहे तशीच ती वंचित साठी ही स्वतः चां राजकीय विस्तार करण्याची गरज आहे,,, आणि या गरजेतून ते एकत्रित येत आहेत आणि त्यास आपली हरकत असण्याचे कारण नाही या दोन्ही पक्षाचे प्रस्थ कर्नाटक मध्ये अस्तित्वात नाही ही पहिली बाब आहे ,
कर्नाटक मध्ये दलीत संघर्ष समिती या नावाने आक्रमक आंबेडकर वादी समूह सार्वजनिक , राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस ला नेतृत्व निर्माण करताना काँग्रेस पक्षाला छेद देवून च ते नेतृत्व विकसित करावे लागते त्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या 9जागेवर उमेदवार उभे केले आहेत त्यातील बहुतांश नेते हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस चे नेते , आमदार व माजी मंत्री असलेले आहेत ,
आणि यातील चार जागांवर मुस्लिम उमेदवार आहेत , यातील कांहीं मतदार संघ “मुस्लिम बहुल ” आहेत
याचा अर्थ राजकारणातील प्रस्थपित नेतृत्वाला समवेत घेऊन , सीमा भागातील उच्चभृ मराठा , मराठी भाषिक , वंचित चां आंबेडकर वादी समूह , व अल्पसंख्यांक यांची मोट बांधून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे राजकारण पुढे रेटणार आहे स्वतः चां मतदार वर्ग निर्माण करण्याचा ही प्रयत्न वंचित करत आहे आणि हा मतदार वाढावा म्हणून त्यांना ही या राजकीय शक्तीची आवश्यकता आहे ,त्या मुळे यात कांहीं गैर आहे असे कुणाला ही वाटण्याचे कारण नाही ,
“राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रू ही नसतो”
असा वाक्य प्रचार नेहमी केला जातो , आणि यातील सत्यता या अशा पद्धतीने उदाहरणासहित आपल्या समोर येतात यातील अनेक बाबी आपणा समोर आहेत ,काल पर्यंत तर स्वतः ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब ठामपणे सांगत होते की पवार साहेब हे भाजपा पूरकच आहेत , आणि ते पुरोगामी किंवा भाजपा विरोधक आहेत हा तुमचा भ्रम आहे , कारण यातील वास्तव ते जाणत नाहीत ,
वंचित ही भाजपा ची “बी टीम”आहे या आरोपावर त्यांचे म्हणणे असे होते की “आम्ही च आमचे मालक आहोत ,,, आम्हाला भाजप शी हातमिळवणी करण्यास कोणी रोखले आहे? ते आम्हीच आम्हाला रोखले आहे “
अजित दादा भाजप समवेत सरकार बनवणार या चर्चा वेग घेत असताना आणि त्या नाकारल्या जात असताना , भाजपचे लाडके उद्योगपती , गौतम जी अदानी यांची आणि पवार साहेब यांची 2तास चर्चा झाली ,
” ना ” पवार साहेब यांचे कडे ” ना” अदानी यांचे कडे फाजील हवा पाण्याच्या गप्पा करण्यासाठी वेळ आहे , मग ते अश्या कोणत्या मौलिक बाबीवर चर्चा करत होते?
अदानी भाजपचे तारण हार आहेत ,
आणि भाजपा अदानी यांची तारण हार आहे ही बाब सर्व श्रुत आहे ,भाजपला जींकण्या साठी चां जो वित्त पुरवठा निधी म्हणून लागतो तो अदानी कडून येतो , आणि त्या बदल्यात अदानी चां नफा अधिक वाढावा म्हणून जितके देता येईल त्याचे दहा पट अदानी ला देण्याची तयारी भाजपा ठेवतो , इतकी त्यांची परस्पर पुरकता आहे “दो जिस्म मगर एक जान है हम” हे नाते मोदीजी आणि अदानी यांचेतील आहे , आणि हे केजरीवाल जी यांनी ही स्पष्ट केलेले आहे “भारत जोडो “यात्रेची सुरुवात राहुल जी गांधी यांनी दक्षिणेतून केली , तिचे कर्नाटक मध्ये प्रचंड स्वागत झाले ,
भाजप मधील अंतर्गत वाद आणि बोमयी सरकार वरील भ्रष्टाचाराचे आरोप याने भाजपचा कर्नाटक मधील जनाधार कमी होऊन काँग्रेस चे सरकार येईल असा ओपिनियन पोल चां सर्व्हे सांगत आहे आणि इथेच ही” ग्यांनबाची मेख” आहे .महाराष्ट्रात “महा विकास आघाडी”ची स्थापना करताना “भाजपाला”सत्ता विन्मुख ठेवणे हाच मुख्य अजेंडा पवार साहेब यांचा होता , म्हणून “हिंदुत्व” न सोडलेल्या शिवसेना पक्षाशी त्यांनी निवडणुकी नंतर हातमिळवणी केली ,त्याचा आराखडा गुप्त ठेवण्यात आला असला तरी तो अचानकपणे घडलेला नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन ही सत्ता समीकरण जुळत नसल्याने त्यांनी काँग्रेस पक्षास “मिनिमन कॉमन प्रोग्राम”वर सत्ता बनवण्यास अनुकूल केले ,
शिवसेनेने आपल्याशी दगाबाजी केली आहे याचे शल्य भाजपला बोचत राहिले , आणि यातून त्यांनी केंद्रीय यंत्रणा चां बेसुमार वापर करीत शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात धडकी भरवली ,त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यावर ही ज्यात अनिल देशमुख सारखे मंत्री होते त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले , जयंत पाटील ते हसन मुश्रीफ यांनी चक्कीत पिसले जाण्याची तयारी केली जात असताना मात्र अजित दादा यांचे विरोधात केंद्रीय तपास यंत्रणा तितक्या कठोर झाल्या नाहीत हे ही वास्तव नजरे आड करून चालत नाही ,
बारामती येथे विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करताना ना नितीन गडकरी ते अदानी पर्यंतचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहताना दिसले ,संस्था आणि विकासाच्या राजकारणात पक्षीय मतभेद आणायचे नाहीत , “वैचारिक मतभेद असावेत , मनभेद नसावेत “या गोंडस तत्वज्ञानाखाली हे सारे आदान प्रदान घडते , (पण असा विकासात्मक कार्यक्रम करताना राहुल गांधी यांचे समवेत भाजपचे मंत्री एकत्रित येताना दिसलेले नाहीत )देश पातळीवर भाजपाला पर्याय देण्याच्या गप्पा मारताना राष्ट्रवादी काँग्रेस यात पुढाकार घेताना दिसेल असे चित्र रंगवले जाते ते कितपत खरे आहे या बद्दल मला तरी शंका आहे
देश पातळीवर भाजपाला मिळणाऱ्या मताची टक्केवारी 37%इतकी आहे
तर काँग्रेस , आप , तृणमूल , राष्ट्रवादी , समाजवादी , बसपा , इत्यादी सर्व विरोधी पक्षाची एकत्रित मतदानाची टक्केवारी ही 63%इतकी आहे याचा सरळ अर्थ आहे की एक मत भाजपला असेल तर दोन मते विरोधका कडे जात असताना ही भाजपा सत्तेत का येते?याचे उत्तर आहे , मताचे विकेंद्रीकरण आणि ते विकेंद्रीकरण , जात , धर्म प्रांतीय अभिमान , भाषा अभिमान आधारित निर्माण झालेले प्रादेशिक किंवा स्थानिक पक्ष ,एम आय एम सारखा पक्ष “मुस्लिम” हिताचे रक्षण करण्याच्या नावाखाली थेट बिहार , गुजरात मध्ये उमेदवार उभे करतो आणि त्याचे उमेदवार 7ते 8हजार मते घेतात तेंव्हा त्या राज्यातील प्रबळ भाजपा विरोधी पक्षाला त्याचा फटका बसतो आणि त्यांची सरकार बनवण्याची संधी भाजपच्या पारड्यात जाते
कर्नाटक मध्ये काँग्रेस चे पारडे जड असल्याचे निदर्शनास येताच भाजपचे चाणक्य आणि भांडवलदार सक्रिय झाले असावेत आणि थेट संशय येऊ नये म्हणून “अदानी ~पवार”भेट घडवून इथे शिजलेले राजकारण म्हणजे कर्नाटकात निवडणूक लढवण्याचे घोषित करणे आहे , आणि या द्वारे , दलीत , थोड्या फार प्रमाणात मुस्लिम , मराठी भाषिक , आणि काँग्रेस ने तिकीट न दिलेल्या मातब्बर उमेदवारांना तिकीट देऊन त्यांना मानणारा मतदार काँग्रेस चे पारड्या तून काढून भाजप चे राज्य कर्नाटक मध्ये स्थापित करण्यासाठी पूरक भूमिका घेणे आहे असे माझे ठाम मत आहे
ज्या “वंचित “ची एलर्जी राष्ट्रवादी काँग्रेस ला महाराष्ट्रात महा विकास आघाडीत घेण्यास होती , तीच राष्ट्रवादी कर्नाटक मध्ये मात्र एकत्रित येण्यास उत्सुक असते ,स्वतः ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यशवंत राव चव्हाण सभागृहात भेटी साठी जातात , आणि पवार साहेब यांची भेट घेतात , हे सहजा सहजी घडत नाही , आणि घडलेले ही नाही ,
आम्ही कार्यकर्त्यांनी लोकशाहीला धोका आहे म्हणून भाजपचे विरोधात रात्र न दिवस ओरडत रहायचे , सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकायचे आणि तीच भाजपा सत्तेत यावी म्हणून महा विकास आघाडीला सुरुंग लावायचे ही राजकीय खेळी घातक आहे
प्रचंड अस्वस्थ होऊन मी हा लेख लिहिला आहे , आणि मी अत्यंत व्यथित आहे गाव पातळीवरील कार्यकर्त्याने ही भाजपला विरोध केला पाहिजे असे मानणारे आम्ही , भाबडे आहोत की मूर्ख?हे मला पडलेले कोडे आहे , आणि मीच माझ्या थोबाडीत मारून घेत आहे ,
स्वार्थांध राजकारणाचे बळी आमच्या सारखे सर्व सामान्य लोक ठरतात हेच खरे आहे.



