संपादकीय

” फोन आला अन् जरांगे सलाईन काढून अंतरवालीला निघाले, हॉस्पिटलमध्ये मोठा ड्रामा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क                                            

आमरण उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, पण आज दुपारच्या सुमारास जरांगे सलाईन काढून थेट अंतरवालीला जायला निघाले. अंतरवालीमध्ये उपोषणाचा मंडप काढायला पोलीस पोहोचल्यामुळे जरांगे संतप्त झाले, यानंतर त्यांनी सलाईन काढलं आणि ते हॉस्पिटलच्या रूममधून बाहेर निघाले. अंतरवालीमध्ये मंडप काढत असल्याचा फोन आल्यानंतर जरांगे आक्रमक झाले. जरांगे अंतरवालीमध्ये येण्यासाठी निघाल्याचं समजताच जरांगे पाटील यांना पोलीस अधिक्षकांचा फोन आला.

पोलिसांकडून मंडप हलवणार नसल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा त्यांच्या रूममध्ये गेले, त्यामुळे जरांगे यांच्यावर पुन्हा उपचार सुरू होणार आहेत. काय म्हणाले जरांगे? ‘मी इकडे हॉस्पिटलला आलोय आणि तिकडे मंडप काढायला लागले. पोलीस दबाव आणायला लागले आहेत की तुमच्या मराठ्यांच्या आंदोलनाचा मंडप काढा, गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री ही कामंही करायला लागला का? इकडे उपचार घेऊन मी काय करू? उपचार घेऊन तिकडे मराठे वाऱ्यावर सोडायचे का? गृहमंत्र्यांचं सांगून गावात दहशत निर्माण करायला लागले आहेत. तुम्ही कसं आमचं कायदेशीर हक्काचं आंदोलन उठवू शकता? मंडप मोडायला लागले ही कोणती दादागिरी? असं देशात झालंय का कधी? तुम्ही मराठ्यांना चेंगरायला निघाले का?’ असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला. ‘एक चूक झाली दोन चुका झाल्या, किती चुका करायला लागले तुम्ही? समाज ऐकायला लागला म्हणून तुम्ही काहीही करायला लागले का? मराठ्यांना या राज्यात इज्जत राहिली का नाही? माझी लोकं तिकडे अडचणीत आहेत आणि मी सलाईन घेत बसू का? मला कोणत्या जेलमध्ये टाकायचं ते टाका, तिथल्या मंडपाला हात लावू देत नाही’, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे हॉस्पिटलच्या बाहेर येत असतानाच त्यांना पोलीस अधिक्षकांचा फोन आला. मंडप हलवणार नसल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे पाटील शांत झाले आणि पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या खोलीमध्ये रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button