अकलूजमधील ‘त्या’ वादग्रस्त अतिक्रमणावरून सामाजिक कल्याण संघ आक्रमक; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर १८३४ व १८३५ मधील सरकारी जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी (SDM), अकलूज यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संघटनेने दिला आहे.
नेमके प्रकरण काय?🤔
अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पद भूषवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह विलास मारुती भरते, राजकुमार वेळापुरे व इतर काही खाजगी इसमांनी सरकारी जागेवर अनाधिकृत ताबा मिळवून अतिक्रमण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भूमी अभिलेख कार्यालयाकडून झालेल्या मोजणीत या जागेवर अतिक्रमण झाल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

ही जागा नगरपरिषदेच्या हद्दीत येत असतानाही अकलूज नगरपरिषदेने हे अतिक्रमण काढण्याबाबत हतबलता दर्शवली आहे. तसेच माळशिरस तहसीलदार यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित शासकीय यंत्रणा कोणतीही ठोस कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून केवळ टाळाटाळ केली जात असून प्रशासनाची भूमिका संशयास्पद?असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी संघटनेचे पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा देत सांगितले की, “सरकारी जागेवरील हे अतिक्रमण लोकशाही मार्गाने हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.”

यावेळी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



