संपादकीय

आप-काँग्रेसची ४ राज्यांत युती

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले असून दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणा अशा ४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला आपकडून आतिशी, संदीप पाठक आणि सौरभ भारद्वाज तर काँग्रेसकडून मुकुल वासनिक, दीपक बाबरिया आणि अरविंदर सिंग लवली उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लखनौमध्ये सपा-काँग्रेस आघाडीची घोषणा करण्यात आली होती. सध्या भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, पण एकदिलाने लढून भाजपाचा पराभव करू, असे मुकुल वासनिक म्हणाले. तसेच, आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर जागावाटपाचा करार अंतिम झाला. दिल्लीत चार जागांवर आप निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेसने चांदणी चौकसह तीन जागा लढवणार आहे, असे मुकुल वासनिक यांनी सांगितले. चंदीगड आणि गोव्यातील दोन्ही लोकसभा जागांवर काँग्रेस आपला उमेदवार उभे करणार आहे. हरयाणात काँग्रेस ९ जागांवर तर आप १ जागा लढवणार आहे. गुजरातमध्ये आप दोन तर काँग्रेस २४ जागांवर निवडणूक लढवणार आहे असेही मुकुल वासनिक म्हणाले. दिल्लीतील नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या लोकसभा मतदारसंघातून आप निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस ईशान्य, उत्तर पश्चिम आणि चांदणी चौक या जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button