अमेरिकेत मोबाइल नेटवर्क ठप्प! चिनी सायबर हल्ल्याची शंका
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
नवी दिल्ली: अमेरिकेत अनेक ठिकाणी सेल्युलर सेवा बंद झाल्याच्या तक्रारी अमेरिकेन प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत. अचानक लोकांचे मोबाइल काम करणे बंद झाले. अनेकांच्या मोबाइलवरून नेटवर्क गायब झाले. सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नेटवर्क कंपन्यांचे म्हणणे आहे. फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबिओ यांनी मोठ्या प्रमाणात सेल्युलर आउटेजवर चिनी सायबर हल्ल्यांचा इशारा दिला आहे. तैवानवर हल्ला करताना चीनने सायबर हल्ला सुरू केला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. रुबिओ यांनी म्हटले आहे की, मला अमेरिकेतील मोबाईल नेटवर्क ठप्प होण्याचे कारण माहित नाही. तथापि, मला माहीत आहे की, तैवानवर हल्ला करण्यापूर्वी चीनने अमेरिकेवर सायबर हल्ला केला तर परिस्थिती शंभरपट वाईट होईल. ते केवळ सेल सेवा मोबाइल सेवेसह तुमची संरक्षण व्यवस्था, तुमचे पाणी आणि तुमच्या बँका यावरही हल्ला करु शकतील. अमेरिकेत एटीटीचे नेटवर्क डाउन झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर आउटेज नोंदवले गेले आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक बोलूही शकत नाहीत. सर्व प्रथम लोकांना फोन कॉल करण्यात समस्या आली. यानंतर मेसेज पाठवण्याची सेवाही ठप्प झाली. जेव्हा लोक मोबाइलवरुन कॉल करत होते, तेव्हा ते एसओएस दाखवत होते. असा संदेश सहसा नेटवर्क बंद असताना दिसतो. शिवाय ९११ हा हेल्पलाइन क्रमांकही काम करत नव्हता. यूएस मधील ७४ हजारांहून अधिक एटीटी ग्राहकांनी गुरुवार पासून डिजिटल-सर्व्हिस ट्रॅकिंग साइट डाउनडिटेक्टरवर आउटेज नोंदवले. मात्र, व्हेरिझाॅन आणि टी-मोबाइल या अन्य नेटवर्क कंपन्यांच्या ग्राहकांनीही तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यांचे नेटवर्क सामान्यपणे काम करत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. एटीटीने कबूल केले की मोठ्या प्रमाणावर आउटेज आहे, परंतु सिस्टम काम करत नसल्याचे कोणतेही कारण दिले नाही.