महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खालावतेय का…?

प्रतिनिधी आमीर मोहोळकर टाईम्स 9 मराठी नेटवर्क,अकलूज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला महाराष्ट्र…फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून दिशा मिळत गेलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाला “नेमकं झालंय तरी काय” असे म्हणण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे,भारतीय राजकारणाला ज्या ज्या वेळी संघर्ष करण्याची गरज पडली त्या त्या वेळी महाराष्ट्राचा हा सह्याद्री धावून गेला हे आपण सर्वांनी पाहिले…

यशवंतराव ते एकनाथराव असे अनेक मुत्सद्दी मुख्यमंत्री हि पाहिले,अखंड महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणत ८०% टक्के समाजकारण व २०% टक्के राजकारण करणारी अनेक राजकीय घराणे हि आपण सर्वांनी पाहिली परंतु हे करत असताना किंवा आपण ते पाहत असताना राजशिष्ठाचार,आदर,मान,सन्मान करणारी ती पिढी आज इतिहास जमा झालेली दिसतेय,कुठलाही राजकीय आचारविचार न घेता,जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कुठलाही प्रीप्लॅन न घेऊन आलेली एक एक राजकीय “प्रकांड पंडित” आपली आपली राजकीय पोळी भाजत जनतेची दिशाभूल करत आहेत,तरी सुध्दा महाराष्ट्राची जनता मुग गिळून पाहत आहे…

हे सर्व घडत असताना विधी मंडळासारख्या महाराष्ट्राच्या राजकीय मंदिरात आरोप प्रत्यारोप करत,एकमेकावर राजकीय चिखल फेक करत सुसंस्कृत महाराष्ट्राला “कलंक” लावण्याचे काम काहीं जण करत आहेत…आदरणीय,माननीय,सन्माननीय हे शब्द भाषणा पुरतेच आहेत का अशी “शंका” येऊ लागलीय,भ्रष्टाचाराच्या आरोप अनेकावर होत आहेत…

६४ वर्षाच्या या महाराष्ट्राला येथील राजकीय नेतृत्वाकडून अजुन अनेक नव्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे आहेत,महाराष्ट्र स्थापने नंतरची अनेक खेडी आता शहरे बनण्याच्या तयारीत आहेत,ज्या त्या ठिकाणचा पाण्याचा,रस्त्याचा,विजेचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे,हि परिस्थिती असताना “राजकीय संप्रदाय” मात्र सोशल मीडिया सारख्या साधनांवर विकासाची बातचीत करताना दिसत आहे,हे सर्व पाहिल्यावर महाराष्ट्राची राजकीय पातळी खालावत आहे असे मला तरी नक्कीच वाटतेय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button