भटक्या कुत्र्यामुळे सफाळे टेंभिखोडावे रस्त्यांवर अपघातांच्या संख्येत वाढ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा
प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम भागातील सफाळे-टेंभिखोडावे रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांच्या अती वावरामुळे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .सफाळे टेंभिखोडावे हा 9 किलोमिटर अंतराचा रस्ता आहे या रस्त्याच्या मधल्या भागात माकणे , मांडे-मांजुर्ली, विठ्ठलवाडी , विराथन बुद्रुक, चिखळपाडा,जलसार,अशी अनेक गावे आहेत. या गावांमधील मोकाट भटक्या कुत्र्यांचा अधिक वावर या मुख्य रस्त्यावर रोज होत असतो. दोन वर्षा आधी या रस्त्याचे रुंदी व नुतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

या रस्त्यावर असलेल्या गावांचा शेजारी रस्त्यालगत अनेक माध्यमिक व प्राथमिक शाळा असताना देखील एक ही गतिरोधक नसल्याने वाहतूकदार या रस्त्याने आपली वाहने बेलगामपणे चालवत आहेत.यामुळे रस्त्याच्या कडेला उभी असलेली भटकी कुत्रे अचानक रस्ता ओलांडन्याचा प्रयत्न करतात आणि वाहनांना धडक लागून अपघात घडतो . दहा-बारा दिवसांपूर्वी टेंभिखोडावे येथील देवराम गावड व विराथन बुद्रुक येथील सुनील घरत आपल्या दुचाकीवरून जात असताना मांडे- मांजुर्ली बस स्टॉप वर या मोकाट भटक्या कुत्र्यांमुळे त्यांचा अपघात झाला होता तसेच संजय गावड ,मनोहर भोईर या व्यक्तींचा देखील अश्याच प्रकारे अपघात झाला होता.

भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आत्तापर्यंत अनेक नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर काहींना आपलं जीव देखील गमवावा लागला आहे.यामुळे प्रशासनाने आणि या भागातील संबंधित ग्रामपंचायतीनी या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा किंवा अन्य ठिकाणी त्यांचे स्थलांतर करावे किंवा नसबंदी सारखी मोहीम राबवून या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी या भागातील ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे.



