क्राईम

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कामगिरी: अकलूज परिसरातील चैन स्नॅचिंग व जनावर चोरीचे गुन्हे उघड; सराईत गुन्हेगारांसह मुद्देमाल जप्त

Times 9 Marathi News Network

अकलूज : माळशिरस तालुक्यातील लवंग व गणेशगाव येथे घडलेल्या चैन स्नॅचिंग आणि जनावर चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिली कारवाई
चैन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी जेरबंद
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी माळशिरस तालुक्यातील लवंग येथे फिर्यादी यांच्या आई व आजी पडवीत झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व कर्णफुले चोरून नेले होते. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या आधारे कर्मवीर चौक, अकलूज येथून टिल्ल्या उर्फ तेजस सोमनाथ जाधव (रा. सवतगव्हाण, अकलूज) याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने अर्जुन विजय चव्हाण व करण महादेव चव्हाण यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २१,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दुसरी कारवाई
दिनांक ३० व ३१ मे २०२६ च्या दरम्यान गणेशगाव (ता. माळशिरस) येथून फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोरून ४ शेळ्या व ५ बोकड चोरीला गेले होते. याप्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने विजय चौक, अकलूज येथून दीपक रामा काळे (रा. बिजवडी, ता. माळशिरस) याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने प्रल्हाद बाबू काळे व नितीन सरदार चव्हाण (रा. बाबळी पूल, अकलूज) यांच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी दीपक रामा काळे हा सराईत गुन्हेगार असून मोहोळ पोलीस ठाण्यातील ३, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील २ आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील २ अशा एक एकूण ७ गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला (पाहिजे) आरोपी आहे.

ही यशस्वी कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल मुळे, पोलीस हवालदार मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्धराम कंटोळी, व्यंकटेश्वर मोरे, राहुल दोरकर, हरिश थोरात व बाळराजे घाडगे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button