शहर

वसई विरार महापालिकेत दिशा समितीची बैठक संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत..भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

केंद्र शासन पुरस्कृत योजना जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण (दिशा) समितीची सभा बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सभागृहात खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

खासदार राजेंद्र गावित यांनी वसईकरांसाठी केंद्र शासनाकडून मंजूर करून आणलेल्या घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प आदींची माहिती दिली.

महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा पालघर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५ हजार ३४४ चौरस किमी असून लोकसंख्या अंदाजे २९ लाख ९० हजार ११६ एवढी आहे. या जिल्ह्याचे ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग आहेत. यामुळेच संपूर्ण जिल्ह्याला लागू होणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांविषयी एका बैठकीत चर्चा न करता दोन भागात करण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या या दिशा समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन, पंतप्रधान आवास योजना, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, वैद्यकीय आरोग्य आणि दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान आदींविषयी विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी कोणते उपाय राबवावेत योजनांसाठी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कशाप्रकारे सुरू आहे याबाबतचा आढावा घेतला गेला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योजना राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दिशा समितीच्या बैठकीत वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, शेखर घाडगे, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार अविनाश कोष्ठी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button