पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्या हस्ते सफाळे पोलीस स्टेशन गणराया पुरस्काराचे वितरण

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.
सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांकडून गैरवर्तन न होता उत्सवाचे पावित्र राखले जावे यासाठी मंडळांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलिसांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पोलिसांनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना समाविष्ट करून मंडळांचे मूल्यमापन करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना केली होती. या समितीने सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन मूल्यमापन केले. त्यानुसार पोलीस स्टेशन हद्दीतील चार गणेश मंडळांना देवभूमी हॉलमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी यांच्या हस्ते गणराया पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी सफाळे बाजारपेठेतील देवभूमीचा राजा हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोत्कृष्ट ठरल्याने त्यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय पुरस्कार एकता मित्र मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तर तृतीय पुरस्कार सफाळे गावातील कूर्लाई मित्र मंडळाला प्रदान करण्यात आला. तसेच नावझे येथील गणेशोत्सव मंडळाला चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार विजेत्या गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सफाळे पोलीस निरिक्षक अविनाश मांदळे, पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, सरपंच तनुजा कवळी, पत्रकार नवीन पाटील, शिक्षक जगदीश किणी, सरपंच महेंद्र पाटील, वृक्षमित्र प्रकाश काळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र ठाकूर व्यासपीठावर विराजमान होते.



