महाराष्ट्र

डोक्यावर भांडी घेऊन विकणाऱ्या आईचा मुलगा नगरसेवक झाला : महेश शिंदेंचा संघर्षमय प्रवास

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत महेश केशव शिंदे यांनी नगरसेवक म्हणून दणदणीत विजय मिळवत सामाजिक संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. भटके-विमुक्त गोंधळी समाजातून आलेल्या, अत्यंत मर्यादित परिस्थितीत वाढलेल्या महेश शिंदेंचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

महेश शिंदे यांची जडणघडण कठीण कौटुंबिक परिस्थितीत झाली. आई आणि मोठ्या भावाच्या आधारावर त्यांनी बालपणापासूनच संघर्ष अनुभवला. आई आजही डोक्यावर भांडी घेऊन विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या कष्टांच्या वातावरणात वाढत असताना जिवलग मित्रांची साथ, समाजातील प्रश्नांची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली.

त्यांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये आंबेडकरी चळवळीचा मोठा प्रभाव राहिला. सामाजिक न्याय, समानता आणि हक्कांसाठीची लढाई त्यांनी या चळवळीतून शिकली. पुढे भारतीय जनता पार्टीने त्यांना नवी ओळख, व्यासपीठ आणि विश्वास दिला, असे ते सांगतात. अनेक वर्षे त्यांनी सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत गोरगरीब, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी काम केले. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने, मोर्चे, आक्रमक भूमिका घेत त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.

या सामाजिक कार्याची दखल घेत आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत नगरसेवकपदाचे तिकीट दिले. या तिकिटासाठी शहराध्यक्ष महादेवजी कावळे तसेच सुजय भैय्या माने पाटील यांनी मोठा संघर्ष, परिश्रम आणि त्याग केल्याची भावना महेश शिंदे यांनी व्यक्त केली.

जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत महेश शिंदे यांनी ही निवडणूक जिंकून दाखवली. “हा विजय केवळ माझा वैयक्तिक नसून, आईच्या कष्टांचा, भावाच्या पाठिंब्याचा, मित्रांच्या साथीचा आणि जनतेच्या विश्वासाचा आहे. अकलूज शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाचा आवाज नगरपरिषदेत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

संघर्ष, चळवळ आणि जनविश्वासाच्या बळावर नगरपरिषदेपर्यंत पोहोचलेले महेश शिंदे यांचे यश हे लोकशाहीत अजूनही सामान्य माणसासाठी संधी आहे, याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button