पालघर सहाय्यक लेखाधिकारी रमेश मौळे अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स नाईन न्यूज नेटवर्क. उपसंपादक विजय घरत.. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.
नळ पाणीपुरवठा करण्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी आणि तिचा स्वीकार केल्या प्रकरणी पालघर सहाय्यक लेखाधिकारी रमेश मौळे यांना अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात अटक करून पालघर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या ठेकेदार मित्राला पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कासटवाडी तालुका जव्हार पैकी रामनगर येथे नळ पाणीपुरवठा करण्याकरिता कामाचा कार्यारंभ आदेश जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून देण्यात आला होता. या कामासाठी मनुष्यबळ पुरविणे व काम पूर्ण झाल्यावर कामाच्या बिलासंदर्भात आवश्यक्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून बिलासाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांना ठेकेदार यांनी अधिकार दिले होते. त्यामुळे तक्रारदार शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी वित्त विभाग लेखा शाखा जिल्हा परिषद पालघर येथे जाऊन तेथील सहाय्यक लेखाधिकारी रमेश यशवंत मौळे वय वर्ष (45)यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली यावरून तक्रारदार यांनी मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या सहाय्यक लेखाधिकार्याची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग यांच्या कार्यालयात केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून श्री.सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनिल घेरडीकर ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक श्री.दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, दीपक सुमाडा,विलास भोये, नितीन पागधरे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी, शिपाई जितेंद्र गवळी या पथकाने मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 14. 52 वाजता सापळा रचून पंचा समक्ष सहाय्यक लेखाधिकारी रमेश यशवंत मौळे यांना त्यांच्या वित्त विभाग जिल्हा परिषद पालघर कार्यालयातच तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्यावर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



