अकलूज येथे रत्नाई चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा उदघाट्न समारंभ
अकलूज प्रतिनिधी -तात्यासाहेब काटकर
प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज १९७६ पासून ते आजतागायत सामाजिक बांधीलकीतुन विविध स्पर्धांचे, उपक्रमांचे आयोजन करत आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाचे व्यासपीठ मिळावे. मुलांचा शारीरीक व बौध्दिक विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने संस्थापक मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी रत्नाई चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स.म.शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर येथे करण्यात आले.
स्पर्धेचे उदघाट्न अकलूज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मा. स्वाती सुरवसे यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण ढवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे यांनी केले. त्यांनी मंडळाच्या स्थापनेचा उद्देश, राबविण्यात येणारे उपक्रम याबद्दल माहिती दिली.उदघाट्न प्रसंगी प्रमुख अतिथी सुरवसे मॅडम यांनी मंडळाच्या कार्याचे व उपक्रमांचे कौतुक केले.तसेच स्पर्धेच्या युगात स्पर्धेकांनी आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावा. बुद्धिबळ स्पर्धेचे केंद्र अकलूज होत आहे याचा अभिमान वाटतो.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. प्रविण ढवळे यांनी भविष्यातील विश्वनाथ आनंद हे या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. स्पर्धेची सुरुवात बाल राष्ट्रीय खेळाडू कु.अनन्या बाळापुरे, आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू तसेच माळशिरस तालुक्यातील मुलींमधील प्रथम बुद्धिबळ खेळाडू कुमारी रक्षिता जाधव यांच्यामध्ये सामना होऊन झाली. या स्पर्धा १० वर्ष, १५ वर्ष व खुला गट अशा तीन वयोगटात खेळविण्यात येणार आहेत. यात उत्कृष्ट महिला व पुरुष पालक खेळाडू, सर्वात लहान व सर्वात जेष्ठ खेळाडू, उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूंना रोख बक्षिसे व ट्रॉफी ठेवण्यात आली. ही स्पर्धा स्विझलिंग पद्धतीने खेळविण्यात येत आहे. ‘वयोवृद्ध खेळाडूंचा’ सहभाग ही या स्पर्धेतील विशेष बाब आहे.स्पर्धेसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील एकूण ४०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तीनही वयोगटासाठी स्वतंत्र रोख बक्षिसे, चषक व मेडल अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
सोलापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सदस्य व स्पर्धेचे प्रमुख पंच उदय वगरे, पत्रकार बंधू, स्पर्धाप्रमुख अभिजित बावळे, मंडळाचे सचिव पोपट भोसले पाटील, खजिनदार वसंत जाधव, संचालक मंडळ, सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक उत्कर्ष शेटे, विविध शाखांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. बहुसंख्येने खेळाडू त्यांचे पालक, प्रेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलाही बागवान, रशीद मुलाणी यांनी केले तसेच आभारही मानले. उदघाट्न समारंभ नंतर स्पर्धेला सुरुवात झाली.