महाराष्ट्र

राजकीय विचारसरणीच्या अंताची साक्ष देणाऱ्या घटना.राजकीय पक्षांनाच मतदान का करावे?- ॲड. शीतल चव्हाण

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

(१) फुले-शाहू-आंबेडकरवादी व पुरोगामी विचारांच्या म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांनी पहाटेच हिंदूत्ववादी भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी उरकला. त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने कुठलीही कारवाई केली नाही. उलट ‘मविआ’मध्ये उपमुख्यमंत्री पद दिले. ‘मविआ’मध्ये अडिच वर्ष उपमुख्यमंत्री पद भोगलेल्या व शिंदे गटाला ‘खोकेबाज’ ठरवणाऱ्या अजित पवारांनी काल भाजप-शिंदे गटाच्या सरकारात आपल्या पक्षाच्या काही आमदारांसह सामील होत पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

(२) सिंचन घोटाळ्यावरुन सतत अजित पवारांवर टिकेची झोड उठवणाऱ्या भाजपाने दोन वेळा अजित पवारांना गोमूत्र शिंपडून पवित्र करत जवळ केले. भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षात घेवूनच पक्षविस्तार केला.

(३) ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपची पोलखोल करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेने कधी भोंगे तर कधी सोंगे करुन सोयीनुसार भूमिका बदलल्या.

(४) कट्टर हिंदूत्ववादी असलेली शिवसेना धर्मनिरपेक्ष कॉंग्रेससोबत गेली. ‘मविआ’ची निर्मिती झाली. विद्यापीठ नामांतराला विरोध करणाऱ्या शिवसेनेने यू-टर्न घेत ‘शिवशक्ती-भिमशक्ती’ची घोषणा दिली.

(५) धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या कॉंग्रेसने कट्टर हिंदूत्ववादी शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. ‘मविआ’चे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी ‘बाबरी मस्जिद आम्हीच पाडली, आम्हाला त्याचा अभिमान आहे’ असे भर सभेत म्हंटल्यावरही धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस गप्प राहिली. ‘मविआ’च्या सभेत हिंदू-वैदिक परंपरेचे प्रतिक असलेली भारतमाता आमचे दैवत असल्याचे जाहीर करण्यात आले, तेव्हाही त्याला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मूक संमती दिली.

(६) भाजपसोबत असताना शिवसेनेचे सतत खच्चीकरण केले गेले. या खच्चीकरणाला कंटाळून स्वाभिमान दाखवत ज्या एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारात दाखवली त्याच एकनाथ शिंदेंनी ‘मविआ’मधून बाहेर पडत, शिवसेनेसोबत बंडखोरी करीत भाजपशी हातमिळवणी केली.

(७) डावे, आंबेडकरवादी पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी लढाऊ पक्ष-संघटनांना देशातील व राज्यातील पक्षांनी आपापल्या सोयीनुसार वापरुन घेतले. पैसा, वर्ण-जात वर्चस्वाच्या राजकारणात या पक्ष-संघटना कायमच सत्तेपासून दूर राहिल्या. जनतेच्या न्याय्य-हक्कांसाठी लढणाऱ्या या संघटनांना त्यांचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांवर अवलंबून रहावे लागले. ‘वाईटापेक्षा कमी वाईट बरा’ अशी भूमिका घेवून तडजोड करण्याची नामुष्की पत्कारावी लागली.

तात्पर्य:- राजकीय विचारसरणी वगैरे सगळे मुखवटे आहेत. सत्तेची नाव हेलकावे खावू लागली की हे मुखवटे गळून पडतात व खरे चेहरे समोर येतात. सत्ता मिळवणे, सत्तेद्वारे मूठभर उद्योगपती-भांडवलदार-गुत्तेदार यांचे आर्थिक हित सांभाळून पैसा मिळवणे आणि पुन्हा या पैशांचा वापर करुन सत्तेत येणे हीच एक राजकीय विचारसरणी उरली आहे. जनता मात्र फुकटच स्वत:च्या हितसंबधांच्या प्रश्नांना बाजूला ठेवून पक्षा-पक्षात विभागली जाते.

राजकीय पक्षांची ही मनमानी, आपापसातील मिलीभगत संपवायची असेल तर आता राजकारणाला राजकीय पक्षांच्या पलिकडे जावून बघावे लागेल. आपल्या लोकशाहीला अशा संधीसाधू राजकीय पक्षांच्या चौकटीत बंदिस्त करुन ठेवणे धोक्याचे ठरेल. राजकीय पक्षांचे चिन्ह, विचारसरणी बघून मतदान केले जाते. पण ही मानसिकता आता बदलालया हवी. प्रमुख राजकीय पक्षांनाच मतदान का? हा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे.
आता सत्ता-संपत्तीचे विकेंद्रीकरण करीत स्थानिक पातळीवरील व्यक्ती, संघटनांनी निवडणूकांच्या मैदानात उतरावयास हवे. जनतेनेही त्यांस पाठिंबा द्यावा आणि ठराविक राजकीय पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आणावी.

ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button