महाराष्ट्र

माढा लोकसभा मतदारसंघात 2024 ला निष्क्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे भाजपला जिंकण्याची शाश्वती धुसर -मयूर कुपाडे

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेल्या आणि मोदी लाटेत सुद्धा २०१४ पर्यंत त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ लोकसभा निवडणुकीला फक्त आणि फक्त मोहिते पाटील यांच्या मदतीने भाजपला तिथे सुरुंग लावताना राष्ट्रवादीचे वर्चस्व संपवता आले ही काळ्या दगडावरची रेष आहे..

केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच आपल्या राजकीय कारकिर्दीत आजतागायत कोणत्याही निवडणुकीत कधीही निवडून न आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच निवडून येऊन त्यावेळी थेट माढा लोकसभेचे खासदार झाले..

पण खऱ्या अर्थाने त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात थेट शरद पवारांनाच शह देण्यासाठी पडद्यामागे अनेक समीकणाची जुळवा जुळव करण्यात आलेली होती आणि त्याचाच एक मुख्य भाग म्हणून देवेंद्रजींमार्फत थेट मोहिते पाटलांकडून बेरीज वजाबाकीचे राजकारण करण्यात आलले होते..

आज उघड उघड सांगायला हरकत नाही पण त्यावेळी अगदी राष्ट्रवादीच्या फलटणच्या रामराजेसाहेबांनी देखील केवळ आणि केवळ मोहिते-पाटील यांच्या शब्दाखातर भाजपला साॅफ्ट कॉर्नर देत माण – फलटण तालुक्यात आपली सगळी अस्त्र म्यान केलेली होती..

मात्र सध्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय परिस्थिती खासदार निंबाळकरांमुळे भाजपच्या पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे..केंद्रीय नेतृत्वाकडे माढा लोकसभा डेंजर झोन मध्ये असल्याचे एक दोन न्हवे तर तब्बल तीन सर्व्हे आहेत….

आणि म्हणूनच आज नाईलाजाने हे लिहावं लागतंय….

जे मतदारसंघ भाजप जिंकू शकला नाही ते मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने “लोकसभा प्रवास योजना” आखत आपल्या केंद्रीय मंत्र्याकडे त्या-त्या मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे..

भाजप तर्फे माढा लोकसभा मतदारसंघात देखील लोकसभा प्रवास योजना आखत थेट केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे..

महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघ हा एकमेव असा जिंकलेक्या मतदारसंघात अपवाद आहे की तिथे लोकसभा प्रवास योजना आखली गेलेली आहे..

याचा अर्थ काय??
तर गतवेळेस २०१९ ला जिंकून देखील केंद्रीय नेतृत्वाला यावेळी माढा लोकसभा जिंकण्याची शाश्वती नाहीये.

आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हेच आहेत..

ही व्यक्ती गेली चार वर्ष मतदारसंघात फिरकली नाही, ना निधी वाटप केला..

एकाबाजूला माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षांपासून निष्क्रिय असलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विषयी इथे जनतेमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे..तर दुसऱ्या बाजूला मतदारसंघात दमडीचा निधी वाटप न केल्याने पक्षाचे कार्यकर्ते व संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी देखील खासदार निंबाळकर यांच्या विषयी अगदी दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत तक्रारी नोंदवल्या आहेत..

असं का झालं??
तर गेल्या ४ वर्षांत खासदार निंबाळकरांनी भाजप पक्ष वाढविण्यापेक्षा स्वतःचाच गट बांधण्यावर जास्त भर दिला..अगदीच त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे निंबाळकरांनी अकलूज शेजारील श्रीपूर महाळुंग निवडणूकीच्या वेळेस खुमखुमी म्हणून विनाकारण मोहिते-पाटलांना डिवचले तर स्वतःच्याच तालुक्यात, फलटण मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला साॅफ्ट कार्नर दिलेल्या रामराजे निंबाळकर व त्यांच्या सर्व गटाबरोबर वैयक्तिक शत्रुत्व निर्माण केले..

माढा नगरपंचायती निवडणुकीत मध्ये वरिष्ठांना सांगितले मी सर्व बघतो काळजी नसावी मात्र, त्यांना आपल्या पक्षाचे पॅनल नव्हे ते सोडा साधा एक उमेदवार देखील उभा करता आला नाही..याच संधीचा फायदा घेत तानाजी सावंत यांनी मात्र स्थानिक भाजपच्याच कार्यकर्त्यांना बळ देत शिवसेनेकडून उभे केले व निवडून देखील आणले..

भले खासदार निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा निवडून आले पण एक प्रगल्भ राजकारणी म्हणून पक्षासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेत.सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचा वकूब नसल्याने वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याच पक्षातील मातब्बर मोहिते-पाटील व पक्षाबाहेर हितचिंतक असलेल्या लोकांसोबत कुरघोड्याचे राजकारण करत राहिल्याने निंबाळकरांनी पक्षासाठी बेरजेचे समीकरण जुळवायचे सोडून थेट संपूर्ण मतदारसंघच आज डेंजर झोन मध्ये ढकललेला आहे..

पंढरपूर लोणंद रेल्वे असेल किंवा अगदी नीरेच्या पाण्याचा प्रश्न असेल हे जुने प्रश्न होते..
मागील आपल्या देवेंद्रजींच्या सरकारने हे प्रश्न मार्गी लावले पण फक्त पवारांना विरोध करून माढा लोकसभा ताब्यात येणार नाही हे निंबाळकरांना अजुनही उमगलेले नाहीय..माढा लोकसभेचा आजतागायचा सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून जनता उघडपणे आता निंबाळकरांना बोलू लागली आहे..

गावात रूपयचा निधी टाकला नाही.. चार वर्षात एक काम दिले नाही.. त्यामुळे आता पक्षातील नेत्यांनीच काय अगदी मोदी साहेबांनी सांगितले तरी सुद्धा निंबाळकरांना आम्ही मतदान करणार नाही अशी थेट भूमिका इथले गावा गावातील पुढारी फक्त या खासदारांच्या निष्क्रियतेमुळे आज घेऊ लागलेत..

खासदार निंबाळकरांनी परवा अकलूज येथे बोलताना मीच पुढचा माढ्याचा उमेदवार असेन असं म्हणून स्वतःच स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे..
यातच निंबाळकर लोकसभेसाठी राजकीय जुळवा जुळव करताना दिसत असून, अजितदादांचे निकटवर्तीय गेले माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रवादी पुरस्कृत करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, माळशिरसरचे उत्तम जानकर यांच्या सोबत संधान साधत आहेत जेणे करून लोकसभा निवडणुकीत त्यांचा आपल्याला फायदा व्हावा..

पण खासदार निंबाळकरांच्या या असल्या बालिश राजकीय जुळवाजुळवीमुळे भाजपचे माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते हे अडचणीत येऊ शकतात..आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांसोबत निंबाळकरांनी बांधलेल्या संधानामुळे आमदार रामभाऊ सातपुते यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे..

तर दुसरीकडे करमाळ्यात राष्ट्रवादीचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या सोबत निंबाळकर वैयक्तिक संबंध सांगत असले तरी, तिथे देवेंद्रजींचे पट्टशिष्य आणि एकनाथजी शिंदेंचे अतिशय निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी देखील निंबाळकरांचे असेच सुरु राहिल्यास आम्हाला आता वेगळा विचार करावाच लागेल म्हणून संदेश दिलेला आहे..

तिसरीकडे माढा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार राहिलेले संजय कोकाटे यांनी तर खासदार निंबाळकर हेच पुन्हा उमेदवार असतील तर थेट उघड उघड विरोध करू अशी भूमिका घेतलेली आहे..

विधानसभेच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या करमाळा व माढा मतदारसंघातील सगळे शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी खासदार निंबाळकरांनी आपले विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बांधलेल्या या संधानामुळेच त्यांच्या विरोधात आपली भूमिका जाहीर केलेली आहे..

निंबाळकरांनी खासदार झाल्यावर सर्वप्रथम नियुक्ती केलेला त्यांचा खास माणूस असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आज कुठायत??
त्यांना पदावरून का काढावं लागलं??
निंबाळकरांनी ज्या माणसाला पक्षाचा जिल्हाध्यक्ष केला त्याने तर थेट वैयक्तिक कारनाम्याने संपूर्ण जिल्हा भाजपाची मान अतिशय शरमेने खाली घालायला लावली ही गोष्ट लोक विसरणारी नाहीत..

एकंदरीत हे सगळे बघितले असता, ज्याअर्थी खासदार निंबाळकर हे स्वतःच स्वतःच्याच उमेदवारीसाठी व राजकीय बांधणीसाठी धावपळ करत आहेत त्यावरूनच ते स्वतःच्याच भाजप पक्षाच्या, युतीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीसाठीचे काम तर करत नाहीत ना असा प्रश्न माढा लोकसभा मतदारसंघातील युतीचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत..

आणि नेतृत्वाला या सगळ्याचा सारासार, गांभीर्याने विचार करूनच यंदा उमेदवार द्यावा लागणार आहे…

माढा लोकसभा
पश्चिममहाराष्ट्र
ग्राऊंडरिपोर्ट

  • मयूर कुपाडे

mayurkupade

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button