ऐतिहासिक क्षण..! भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर विश्वचषक जिंकलाच..!

🎯 प्रत्येक भारतीयांच्या तोंडून “शाब्बास पोरींनो” हे गौरवोद्गार पडले बाहेर…!
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचला असुन रविवारी (3 नोव्हेंबर 2025) नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या थरारक अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषक (World Cup) ट्रॉफीवर आपले नाव कोरले…
स्वप्नपूर्ती..! तिसऱ्या प्रयत्नात यश
२००५ आणि २०१७ मध्ये हुकलेले विश्वचषकाचे स्वप्न कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने साकार केले.अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले होते.या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला…

दीप्ती शर्मा,शेफाली वर्मा चमकल्या…!
भारताच्या विजयात अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.तिने अर्धशतकी खेळीनंतर अप्रतिम गोलंदाजी करत पाच बळी घेतले आणि संघाला विजय मिळवून दिला.सलामीवीर शेफाली वर्मा हिनेही शानदार फलंदाजीसह गोलंदाजीत मोलाची कामगिरी केली.तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी तिला सामनावीर (Player of the Match) म्हणून गौरवण्यात आले…
कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड्टचे झुंजार शतक व्यर्थ…
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड्ट हिने झुंजार शतक (101 धावा) झळकावले,पण तिच्या संघाला पराभव टाळता आला नाही.दीप्ती शर्माने तिला बाद करताच भारताचा विजय निश्चित झाला…

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वगळता महिला वनडे विश्वचषक जिंकणारा भारत हा चौथा संघ ठरला आहे.या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात अक्षरशः दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली असून सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले आहे…
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वकप जिंकल्याने एवढ्या मध्यरात्री सुद्धा सोशल मीडिया वर प्रत्येक भारतीयांच्या तोंडून “शाब्बास पोरींनो” हे गौरवोद्गार बाहेर पडलेले पहायला आणि ऐकायला मिळाले,हे विशेष…



