बार्शीतील कुटुंबाला बदनामीची धमकी देऊन खंडणी मागणी प्रकरणातील आरोपींचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला

उपसंपादक—-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
फिर्यादीने आरोपी विरुद्ध दाखल केलेला ३६ लाख रुपयांचा फसवणुकीचा फौजदारी खटला मागे घे म्हणून धमकी देऊन बदनामीकारक पोस्टर शहरात वाटून बदनामी टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध बार्शी शहर पोलिसात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विजय बाळकृष्ण साळुंके , निखिल दत्तात्रय मस्के यांचा जामीन बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी फेटाळला.
एका महिलेने याबाबत पोलीसात फिर्याद दिली होती. योगेश वसंत लोखंडे, जुगलकिशोर बन्सिलाल तिवाड़ी, सतीश सुरेश जाधव, विजय बाळकृष्ण साळुंखे, निखिल दत्तात्रय मस्के (सर्व रा. बार्शी) यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा नोंद आहे. यापैकी विजय साळुंके आणि निखिल मस्के यानी अटक पूर्व जामीनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी महिलेने न्यायालयात यातील संशयित आरोपी योगेश लोखंडे व सतीश जाधव यांचे विरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला मागे नाही घेतला तर तुझ्या कुटुंबाची बदनामी करीन अशी धमकी (दि. २६) एप्रिल रोजी सकाळी योगेश लोखंडे, जुगलकिशोर तिवाडी,
सतीश जाधव यांनी चारचाकी गाडी घेऊन फिर्यादीचे घरी येऊन दिली. तसेच खटला मागे न घेतल्यास बदनामीकारक पोस्टर वाटप करून तुझ्या कुटुंबाची व तुझ्या नवऱ्याची बदनामी करीन असे धमकावले.
दि. २६ रोजी संशयितांनी शहरातील बस स्टैंड परिसरात पोस्टर वाटले, फिर्यादीचे पती यांना फोनद्वारे कळवले पतीने बदनामी होत आहे बोलवून घेऊन मिटवून टाक., मनस्ताप नको म्हणून पत्नीस फोन केला. ती बदनामी टाळण्यासाठी फिर्यादीने लोखंडे, तिवाडी, जाधव यांना बोलावून घेतले. या तिघांनी फिर्यादीस तुझ्या कुटुंबाची बदनामी करणारे फोटो बसस्टैंड परिसरात वाटणे सुरू आहे. रोख ५० हजार रुपये आताच दे, तरच मी थांबवतो असे धमकावले. पैसे रोख नाहीत खात्यावर पाठवू का? असे म्हणाल्यावर तिवाडी व जाधव याने योगेशच्या खात्यावर आता फक्त पाच हजार पाठव, त्याचे खाते आहे.तसेच उरलेले ४५ हजार रुपये उद्या सकाळी ११ वाजेच्या आत रोख दे असे पैसे खात्यावर ऑनलाइन घेता येत नाहीत असे सांगून कागदावर लोखंडे याचा खाते क्रमांक देऊन त्यावर पैसे पाठवायला सांगितले. आरोपींनी धमकावल्यामुळे आणि बदनामी थांबवण्यासाठी भीतीने फिर्यादीने लोखंडेच्या खात्यावर पाच हजार रुपये पाठवले. दि. २७ रोजी लोखंडे, तिवाडी व जाधव यांनी सकाळी फिर्यादी व पतीचे फोनवरून पैसे मागितले. नंतर तिवाडी यांच्या मोबाइल नंबरवरून फिर्यादीचा मोबाइल नंबरवर एसएमएस आला. वेळ संपला, तुम्ही दोघे नवरा बायको फोन उचलत नाहीत. आता तुम्ही फोन करा आम्ही उचलणार नाहीत.
विजय साळंखे आणि निखिल मस्के यांनी आम्हाला पोस्टर वाटायला पैसे दिले आहेत. आता बसा रडत असा उल्लेख आहे. त्यामुळे या संगनमताने केलेल्या कटकारस्थानामध्ये विजय साळुंखे, निखिल मस्के हेही सहभागी आहेत,
अशा आशयाची तक्रार दिली आहे. त्यावरून संशयितांवर गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. अटक पूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील श्रीमती आर. एम. कदम तसेच मूळ फिर्यादी तर्फे ॲड. प्रशांत एडके यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲड. अनिल पाटील यांनी बाजू मांडली. न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यातील आरोपी योगेश लोखंडे याच्यावर यापूर्वी दोन खंडणीचे गुन्हे नोंद आहेत त्यापकी वाळू वाहतूकदार यांस मागितलेल्या खंडणी प्रकरणात लोखंडे याचा जामीन झालेला नाही त्यावर हा तिसरा खंडणीचा गुन्हा नोंद झालेला आहे.



