‘कायदा व परिस्थिती विषयक जाणीव ठेवा’ : ॲड. संभाजी निंबाळकर. सदाशिवराव माने विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन

अकलूज (प्रतिनिधी) तात्यासाहेब काटकर
समाजात अराजकता माजू नये आणि शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी शासनाने विविध कायदे तयार केले आहेत. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिक आपल्या कृतीसाठी कायद्याने स्वतः जबाबदार असतो. त्यामुळे प्रत्येकाने कायदा आणि परिस्थितीविषयक जाणीव ठेवून वागले पाहिजे, असे प्रतिपादन माळशिरस न्यायालय वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संभाजी निंबाळकर यांनी केले.
येथील सदाशिवराव माने विद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात ॲड. निंबाळकर यांनी दिवाणी व फौजदारी कायदे, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, सोशल मीडियावरील गुन्हे, सायबर क्राइम, बाल न्यायालय, सुधारगृह, मुलींच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, छेडछाड विरोधी कायदे, पोक्सो (POCSO) ॲक्ट तसेच परीक्षेतील गैरप्रकार व गुन्हे यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “कायदा हा केवळ न्यायालयीन प्रक्रिया, कलमे आणि नियमांचा विषय नसून समाजव्यवस्थेला न्याय, समानता आणि शिस्त प्रदान करणारे एक महत्त्वाचे साधन आहे. कायदेविषयक ज्ञान असणे ही केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून समाजात न्याय आणि हक्कांचे संरक्षण करण्याची ती एक मोठी जबाबदारी आहे.”

पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “तरुण भारताचे जबाबदार नागरिक म्हणून जगताना कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियाचा अतिवापर टाळून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आपण कोणाशी मैत्री करतो याचे भान ठेवावे आणि आपल्या कोणत्याही वर्तनामुळे पालकांची मान खाली झुकणार नाही, याची सदैव काळजी घ्यावी.”
या कायदेविषयक व्याख्याना प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, विभागप्रमुख संजय जाधव, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काकुळे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा निंबाळकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनिता सुर्वे यांनी मानले.



