अदानींची पाठराखण पवारांचे नवे धोरण?

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी उद्योग समूहाची पाठराखण करणारे विधान केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अदानी उद्योग समूहाविषयी हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर या उद्योग समूहाविरोधात बहुतेक विरोधी पक्षांनी रान उठवले आणि याप्रकरणी संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमावी, अशी एकमुखाने मागणी केली. या गदारोळात संसदेचे कामकाज जवळजवळ ठप्पच झाले. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी विरोधी पक्षांचा हात सोडून वेगळी चूल मांडल्याने तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
राजकारणात शरद पवार कोणत्या वेळी कोणती खेळी करतील, याचा काहीही अंदाज आजवर करता आलेला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, तेव्हा पवार यांनी अनाहुतपणे, न मागता भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यापूर्वीचा त्यांचा राजकीय इतिहासही अशाच निर्णयांचा आणि धोरणाचा आहे. मित्र म्हणून ज्याच्याशी हातमिळवणी करतील, त्याचा हात ते केव्हा सोडतील, याचा काहीच भरवसा नसल्याचे राजकीय वर्तुळात नेहमीच बोलले जात असते.
त्यामुळे आताही अदानी उद्योग समूहाचे समर्थन करण्याच्या त्यांच्या विधानाने ही त्यांच्या नव्या धोरणाची नांदी आहे का, अशी चर्चा सुरू झाली, तर त्यात काही आश्चर्य नाही. शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी हे अलीकडेच एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले होते. त्याचवेळी नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये पवारांच्या अदानी समूहाविषयीच्या वक्तव्याने भर पडली आहे.



