महाराष्ट्र

इंदापूरला निधीचा ओघ थांबता थांबेना, दत्तामामांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा ५ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर…

इंदापूर, प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल नं. 8378081147

माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या महिन्याभरापासून विविध विकासकामांसाठी निधीचा अक्षरशः सपाटा लावला असून एक महिन्याच्या कालावधीत आमदार भरणे यांनी शेकडो कोटींचा निधी खेचून आणला आहे. त्यामुळे जरी विरोधी पक्षाचे सरकार असले तरी आमदार दत्तात्रय भरणे मात्र निधी आणण्यात इतर आमदारांच्या तुलनेत नेहमीच दोन पावले पुढे असल्याची प्रचिती पुन्हा एकदा इंदापूर तालुकावासियांना आली आहे.

मागील चार दिवसांपूर्वीच आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांकरिता सुमारे सव्वा तेरा कोटी रुपये मंजूर करून आणले होते. आज लगेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 व आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत इंदापूर तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी जवळपास ५ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

आमदार भरणे म्हणाले की, तालुक्यामध्ये दळणवळण सोयीचे व्हावे या भूमिकेतून आपण सर्वप्रथम रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले असून आजमितीस आपल्या तालुक्यामधील चहोबाजूंनी रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम चालू असून काही ठिकाणचे रस्ते पुर्णत्वास गेले असून काही ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे भविष्यात रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागला आहे. त्यामुळे यापुढे दळणवळणाच्या बाबतीत आपण आता इतर तालुक्यांच्या बाबतीत खूप अग्रेसर असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.

तसेच अजुनही काही भागातील रस्त्यांचा अनुशेष बाकी आहे, आगामी काळात आपण निश्चितपणे निकाली काढणार आहे. भरणे म्हणाले की, आता यापुढे मोठ्या रस्त्यांबरोबरच गाव-खेड्यातील वाड्या-वस्त्यांना सुध्दा मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम हाती घेतले असुन याच अनुषंगाने मागच्या चार दिवसांपूर्वी आपण सव्वा तेरा कोटी मंजूर केल्यानंतर आज लगेच पुन्हा 5.66 कोटींचा निधी आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

बावडा तसेच इतर भागातील सुध्दा असंख्य शेतकरी तसेच नागरिकांची रस्त्याच्या मागणीची सातत्याने निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रा.मा‌.120 बावडा ते माने मळा ते घोलपवस्ती अनपट वस्ती रस्ता (लांबी 4.650 कि.मी) – 3.10 कोटी व प्र.जि.मा.125 भांडगाव ते माने,गायकवाड वस्ती रस्ता (लांबी 3.960 कि.मी.)- 2.56 कोटी या प्रकारे दोन रस्त्यांसाठी 5.66 कोटी निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यामुळे वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडल्या जाणार असल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांसाठी सुध्दा आपण प्रस्ताव सादर केले असून या कामांना ही लवकरच निधी प्राप्त होणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button