इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी व स्मारकासाठी आवश्यक तो निधी देणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा.
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या लक्षवेधी मागणीची घेतली तातडीने दखल

इंदापूर; प्रतिनिधी, एस. बी. तांबोळी,
मोबाईल - 8378081147
वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आश्वासित केल्याप्रमाणे मुंबई येथील मंत्रालयातील दालना मध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी जी पाटील, इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांची संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी वीरश्री मालोजीराजेंच्या गढी व स्मारक संवर्धनासाठी जास्तीत जास्त रकमेचा आराखडा तयार करणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना बैठकी प्रसंगी दिली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्याप्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून इंदापूर सह राज्यभरातील तमाम शिवप्रेमींचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य असलेल्या इंदापूर शहरातील गढी व स्मारकाच्या संवर्धनाची आग्रही मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली.
लक्षवेधी प्रश्नाचा विचार करून राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत लवकरात लवकर आमदार भरणे यांच्यासोबत सदर विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेणार असल्याचे आश्वासित केले होते. त्या अनुषंगाने आज मंत्रालयात मंत्री लोढा यांनी आमदार भरणे तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व अधिकारी यांच्यासमवेत संयुक्तरित्या बैठक घेतली. याप्रसंगी मंत्री लोढा यांनी इंदापूर शहरातील वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीची एकूण जागा किती आहे. त्यासंबंधीच्या सर्व इतिहास बाबींच्या नोंदीची माहिती तसेच अतिक्रमण किती आहे याचा संक्षिप्त अहवाल लवकरात लवकर पर्यटन विभागाच्या संबंधित कार्यालयास सादर कराव्यात असा सूचना केल्या.

यावेळी ऑनलाईन बैठकीस उपस्थित असलेले जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील तसेच इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे हे उपस्थित होते.




