शहर

समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147

पुणे समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा सोमवार (दि. २०) पासून आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा, माजी नगरसेविका शकुंतला मखरे यांनी निवेदनाद्वारे समाज कल्याण आयुक्तांना दिला आहे.

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूरात भिमाई प्राथमिक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व राजमाता अहिल्याबाई होळकर उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालविण्यात येतात. या संस्थेची दोन वसतिगृहे आहेत. संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे २०२१ मध्ये निधन झाले. त्यानंतर अवघ्या १६ व्या दिवशी खोट्या अहवालाच्या आधारे संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता.

तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणातील वस्तुस्थिती त्यावेळचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला तत्काळ स्थगिती दिली होती. काही कालावधीनंतर आश्रम शाळेचे फेरमूल्यांकन होऊन पूर्वीच्या खोट्या अहवालात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले होते.

स्थगिती काळात संगीता डावखर या मुख्याध्यापकांना वारंवार फोन करुन मी आत्ता प्रशासक आहे. संस्थेची सर्व कागदपत्रे, चेकबुक माझ्या ताब्यात द्या. सगळे आर्थिक व्यवहार मी पाहणार आहे, असे सांगत असत. या बाबत रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी, त्यांच्या वरिष्ठांबरोबर चर्चा केल्यानंतर वरिष्ठांनी डावखर पैश्यांसाठी तसे करत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे सांगितले. त्या काळात मखरे व त्यांचे कटंबीय दःखात असल्याने त्यांनी डावखर याच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष केले होते..

यामुळे दुखावले जावून सहाय्यक आयुक्त डावखर यांनी आपल्या संस्थेच्या काही जुन्या, नैतिक अधःपतन झालेल्या गुन्हे दाखल असलेल्या किमान पाच वर्ष व कमाल वीस वर्ष संस्थेचा संबंध नसलेल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संस्थेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. १५ ते १६ वर्षापूर्वी स्वतःहून नोकरीचा त्याग केलेल्या पूर्वीच्या कर्मचाऱ्याच्या, पुणे शाळा न्यायाधिकरण पुणे व शाळा न्यायाधिकरण यांनी फेटाळून लावलेल्या २०१३ च्या अपिलावरील आदेश जाणीवपूर्वक लपवून ठेवत त्याला कामावर रुजू करून घ्या. त्याचे थकीत वेतन द्या अन्यथा अनुदानातून कपात करण्यात येईल अशी धमकी संगीता डावखर देत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे वतीने शाळा न्यायाधिकरण पुणे व बारामती न्यायालयात वेळोवेळी दिलेले म्हणणे आणि दि. १० मार्च २०२३ चा आदेश खूपच विसंगत आहे.

भटके विमुक्तांच्या शिक्षणासाठी यशस्वीरित्या चालवलेली संस्था आर्थिक अडचणीत आणून बंद पाडण्यासाठी डावखर या जातीयवादी भूमिकेतून काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांशी संगनमत करुन केलेले षडयंत्र रचत आहेत. संगीता डावखर यांची दुसऱ्या एका प्रकरणात cctv खरेदी घोटाळा प्रकरणी 55 लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर कारवाई प्रस्तवित आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शकुंतला मखरे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button