महाराष्ट्र

शिवसेनेची स्थापना केंद्रीय निवडणूक आयोगाने नव्हे, माझ्या वडिलांनी केलीय-उद्धव ठाकरे.

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही चुना लगाव आयोग असे म्हटले. भाजपला पूर्वी कुत्राही विचारत नव्हता, शिवसेनेच्या पाठिंब्याने वर आले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केली. ते म्हणाले की, वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत ते. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील, पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं. ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं नाही, तेदेखील आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत आहेत. हे गद्दार तिकडे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर गेले. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. एक काळी टोपीवाला होता, गेला. त्यांनी शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाईंचा अपमान केला. दिल्लीसमोर झुकण्याचे विचार बाळासाहेबांचे नाहीत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे आज ज्या ठिकाणी सभा घेताय, त्याच ठिकाणी १९ मार्च रोजी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांची सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी यावेळी दिली. तसेच आमच्या या सभेतून व्याज्यासह त्यांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे खेडमध्ये येतायत म्हणून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले आहे. यामध्ये खेडमधील २ टक्के देखील स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश नाही. रामदास कमदचा या लोकांनी किती दसका घेतलाय, हे यामधून दिसून येतंय. बाहेरची लोक आणून इथे राजकारण होत नाही, असा टोलाही रामदास कदम यांनी यावेळी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button