बोईसर येथील एका खाजगी कार्यालयावर भर दिवसा सशस्त्र दरोडा
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील ओसवाल परिसरातील राजश्री इंटरप्राईजेस या खाजगी कार्यालयात शुक्रवारी भर दिवसा दुपारी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम आणि अंगावरील सोन्याचे दागिने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे.
बोईसर येथील ओसवाल एम्पायरच्या रिषभ अपार्टमेंटमधील राजू राठोड आणि सुरेंद्र राठोड यांच्या राजश्री इंटरप्राईजेस या खाजगी कार्यालयावर शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी दुपारी तीन वाजता सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकून या कार्यात काम करणाऱ्या एका महिलेला आणि एका तरुणाला बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवत
त्यांना दोराने खुर्चीला बांधून कार्यालयातील साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व तरुणाच्या गळ्यातील चेन आणि चहा घेऊन आलेल्या माणसाच्या हातातील अंगठी असा एवज लुटून या दरोडेखोरांनी पोबारा केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांना तपासाचे आदेश दिले आहेत.