महाळुंग येथील विवाहिता छळ प्रकरण: मुख्य आरोपी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास, ५ जणांची निर्दोष सुटका

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील एका विवाहितेच्या छळ आणि आत्महत्येप्रकरणी अकलुज न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पती रविंद्र बिभीषण आढाव याला दोषी ठरवत अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. ताम्हाणेकर यांनी ७ वर्षे सश्रम कारावास आणि एकूण १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित ५ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, याप्रकरणी फिर्यादी जेजरथ दशरथ भालेराव (रा. ऐरोली, मुंबई) यांनी अकलुज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी रविंद्र बिभीषण आढाव आणि इतर ७ जणांवर (रा. गट नंबर २, महाळुंग, ता. माळशिरस) अकलुज पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७५/२०१६, भारतीय दंड विधान संहिता (भा.द.वि.) कलम ४९८ (अ), ३०६, ३०४ (बी), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल केले होते. माळशिरसचे अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने मुख्य आरोपी रविंद्र आढाव याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
भा.द.वि. कलम ३०४ (बी) अन्वये: ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास.
भा.द.वि. कलम ३०६ अन्वये: २ वर्षे सश्रम कारावास आणि ३,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त सश्रम कारावास.
भा.द.वि. कलम ४९८ (अ) अन्वये: १ वर्ष सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ ते ६ यांची सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
या केसमध्ये अकलुज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी योग्य मार्गदर्शन केले. तर न्यायालयात सरकारी वकील म्हणून संग्राम एस. पाटील यांनी प्रभावी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हवालदार रियाज तांबोळी आणि हरीष भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले.



