महाराष्ट्र

अकलूजमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा गोडवा! निलेश शिंदे यांच्याकडून १० वर्षांपासून ‘शब-ए-कद्र’निमित्त मिठाई वाटप

Times 9 Marathi News Network

​अकलूज : आजच्या काळात जिथे सर्वत्र सामाजिक भेदाभेदाच्या चर्चा ऐकायला मिळतात, तिथे सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये एक वेगळाच आदर्श पाहायला मिळत आहे. येथील प्रसिद्ध ‘कृष्णा स्वीट होम’चे मालक निलेश चंद्रकांत शिंदे यांनी आपल्या कृतीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे एक अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

​गेल्या १५ वर्षांपूर्वी निलेश शिंदे यांनी अकलूजमध्ये ‘कृष्णा स्वीट होम’ या मिठाईच्या दुकानाची मुहूर्तमेढ रोवली. अल्पावधीतच आपल्या चविष्ट मिठाईमुळे हे दुकान पंचक्रोशीत नावारूपाला आले. मात्र, केवळ व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने शिंदे यांनी गेल्या १० वर्षांपासून एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.

​मुस्लिम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील ‘शब-ए-कद्र’ (मोठी रात्र) या दिवशी निलेश शिंदे स्वखर्चाने आपल्या दुकानातील शुद्ध आणि दर्जेदार मिठाई सर्व मशिदींमध्ये प्रसाद म्हणून वाटप करतात. कोणत्याही प्रसिद्धीची ओढ न धरता, केवळ श्रद्धेपोटी आणि भाईचारा जपण्यासाठी ते हा उपक्रम अखंडितपणे राबवत आहेत.

​”माणुसकी हाच खरा धर्म आहे. सण कोणताही असो, तो आनंद वाटण्यासाठीच असतो. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रात्री आनंदाचा गोडवा वाढवता येतो, याचे मला समाधान वाटते.”— निलेश चंद्रकांत शिंदे (मालक, कृष्णा स्वीट होम, अकलूज)

​महाराष्ट्रात सध्या सामाजिक वातावरण संवेदनशील असताना, निलेश शिंदे यांनी जपलेली ही परंपरा ‘हिंदू-मुस्लिम’ ऐक्याचे प्रतीक ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे केवळ मुस्लिम बांधवांमध्येच नव्हे, तर सर्वधर्मीय नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. अकलूजच्या या ‘गोड’ परंपरेची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button