सलग अकराव्या वर्षी वडवाडी येथील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. अभिनव स्कूलचे विद्यार्थिनी कुमारी आदिती सागरे हिने ८८ टक्के प्राप्त करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर विद्यार्थी कार्तिक मोहिते व विद्यार्थिनी कुमारी सांची कोंढाळकर यांनी अनुक्रमे ८३.४० व ८२.८० टक्के प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच आदित्य गायकवाड यास ८२.४० टक्के प्राप्त झाले.
शाळेतील सर्व शिक्षकांनी दररोजच्या तासिकेसोबत प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केल्याने त्याचबरोबर विविध परीक्षांचा सराव घेतल्याने आम्ही उत्तुंग यश प्राप्त करू शकलो असे मत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवून यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजीव जगताप, उपाध्यक्ष श्री संजीव जगताप, प्राचार्या सौ धनश्री चव्हाण यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.



