महाराष्ट्र

पाच वर्षे दुर्लक्ष आता निवडणूक जवळ आल्यावर आमदार संजय मामा शिंदे यांना बेरोजगाराची आठवण आली,- माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

पाच वर्षे दुर्लक्ष, आता निवडणूक जवळ आल्यावर आ. संजयमामा शिंदे यांना बेरोजगारांची आठवण आली असल्याचा हल्लाबोल माजी आमदार नारायण (आबा ) पाटील गटाकडून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. करमाळा विधानसभा मतदार संघात सध्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे अंतर्गत ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या अभियानात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांचे फॉर्म भरून घेण्याचे काम सुरु आहे. या फॉर्म वर एका बाजूला आमदार संजयमामा शिंदे यांचा फोटो असल्याने यावरून पाटील गटा कडून टिकेची झोड उठवण्यात आली.

याबाबत सविस्तर बोलताना तळेकर म्हणाले कि विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी सन 2013 मध्ये करमाळा तालुक्यातील युवकांसाठी आपण एक सूत गिरणी उभा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. आज दहा वर्षे उलटून गेली तरी करमाळा तालुक्यात आल्यावर सूतगिरणी हा शब्द कागदावर देखील आमदार महोदयानी कधी लिहला नाही. प्रत्यक्षात प्रकल्प उभारणे हे तर केवळ पोकळ आश्वासन ठरले. यानंतर मांगी तलावात कुकडीचे पाणी आणून सदर पाणी हे बंद पाईप लाईन द्वारे करमाळा-मांगी रोड वरील एम आय डी सी मध्ये आणणार अशी घोषणा केली. यामुळे उद्योगास चालना मिळून सुशिक्षत बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा भास करमाळा शहर व तालुक्यातील युवकांच्या मनात निर्माण केला. पण हा प्रकार सुद्धा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी या म्हणी प्रमाणे आंबट झाला. यानंतर उजनी धरण बॅक वॉटर परिसराचा पर्यटन विकास करून तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार अशी पोकळ घोषणा केली. पण पर्यटन विकास खोल पाण्यातच तळाशी बुडून राहिला.

करमाळा तालुक्यातील युवकांना तर फसवलेच पण माढा तालुक्यात छत्तीस गावात म्हैसगाव येथे असलेल्या साखर कारखान्यासाठी भूमिपुत्राना संधी दिली नाही. आता तर कौटुंबिक वाटणीत आयता हाती आलेला हा कारखानाही चालवता आला नसल्याची चर्चा आहे. यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती सारख्या शासनाच्या अभियानाचे करमाळा मतदार संघांचे
ब्रँड ॲम्बेसेडर जर आमदार संजय मामा शिंदे असतील तर बेरोजगार तरुण यावर विश्वास ठेवणार नाहीत. निवडणूक जवळ आल्याने आता आमदार महोदय हे या अभियानाची जाहिरात करत असून याचा त्यांना जनाधार वाढवण्यासाठी काडीचाही उपयोग होणार नसून 2024 नंतर आमदार शिंदे यांचेवर राजकीय बेरोजगारीची वेळ मात्र नक्की येणार असल्याचा टोला तळेकर यांनी लगावाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button