राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पालघर पोलीस दलातर्फे “रन फॉर युनिटी” उपक्रमाचे भव्य आयोजन

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत .भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640
राष्ट्रीय एकता दिनाच्या अनुषंगाने आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार पालघर पोलीस दलातर्फे “रन फॉर युनिटी” या भव्य उपक्रमाचे आयोजन शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश जनतेत राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे हा होता. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत “रन फॉर युनिटी” उपक्रम राबविण्यात आला. वाडा पोलीस ठाणे हद्दीतील मुख्य कार्यक्रमास संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई आणि यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तर पालघर पोलीस ठाणे क्षेत्रातील कार्यक्रमास मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर आणि सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर यांची उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी २ कि.मी. आणि ५ कि.मी. अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी-अंमलदारांसह जिल्ह्यातील सुमारे ८,००० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली आणि एकतेचा संदेश देत मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंना पालघर पोलीस दलाकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा संपूर्ण उपक्रम यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर तसेच विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यशस्वीरीत्या पार पडला.

प्रतिक्रिया-
“राष्ट्रीय एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे आणि समाजात एकात्मतेची भावना निर्माण करणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे.”
–यतिश देशमुख- पोलीस अधीक्षक- पालघर



