पालघर जिल्ह्यातील सफाळे तांदुळवाडी घाटातील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे तांदुळवाडी घाटातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण घाटाचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेला आहे. या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असून नागरिकांमध्ये भीती व संताप वाढत आहे.
रविवारी सकाळी उचवली येथील एका महिलेचा घाटातील उतरणीवर गंभीर अपघात झाला. तर गणपती सणानिमित्त कोरे गावाकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा वाहन घसरून मोठा अपघात झाला, तर दुसऱ्या ठिकाणी एका स्कूटीचे चक्क चाक तुटून रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सणासुदीच्या काळातही अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांचा जीव धोक्यात आहे. सफाळे येथून हायवेकडे जाणारा हा एकमेव मार्ग असून या खड्डेमय रस्त्यावरून जाण्याखेरीज नागरिकांना पर्याय नाही. प्रत्येक क्षणी अपघाताचा धोका डोईजड झाला आहे.
याबाबत स्थानिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करून देखील लोकप्रतिनिधी या ज्वलंत बाबीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांकडून या लोकप्रतिनिधी विरुद्ध असंतोष व्यक्त केला जात आहे.



