महाराष्ट्र

आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकारातून करमाळा माढा माळशिरस या तीन तालुक्याच्या सिंचन प्रश्नसंदर्भात पुणे येथे विशेष बैठक संपन्न

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

करमाळा ,माढा आणि माळशिरस तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी धोरण हाती घेतले जाईल . त्याशिवाय नव्याने राबवण्यात येणाऱ्या योजना व जुन्या सिंचन योजनांच्या दुरुस्त्या तातडीने करून या तिन्ही तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील अशी ग्वाही जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली .कृष्णा -भीमा स्थिरीकरण संदर्भातही या बैठकीत जोर लावण्यात आला .

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकारातून करमाळा ,माढा आणि माळशिरस या तीन तालुक्यांच्या सिंचन प्रश्नां संदर्भात पुणे येथे सिंचन भवन मध्ये विशेष बैठक संपन्न झाली . या बैठकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , आमदार राम सातपुते ,माजी आमदार नारायण पाटील ,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तीन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या बैठकीत मांगी तलाव , कुकडीचे पाणी , निरा देवघर धरणाचे पाणी ,सिनेवरील सिंचन योजना यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा खल झाला . मांगी तलावाला कुकडीच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करावे , दहीगाव सिंचन योजनेची अपूर्ण कामे लवकर पूर्ण व्हावीत , कुकडीचे पाणी करमाळ्याला टेल पर्यंत मिळावे ,सीना कोळेगाव प्रकल्पामध्ये माढा व करमाळा तालुक्यातील नाडी ,रोपळे ,बिटरगाव परिसरातील गावांचा समावेश व्हावा .कृष्णा – मराठवाडा प्रकल्पाच्या जेऊर बोगद्यातून करमाळा तालुक्यातील गावांना पाणी मिळावे .

सिना नदीवर आलेगाव व रीदोरे येथे बॅरेज व भिमेवर सुस्ते येथे बॅरेज बांधावे . सिना माढा सिंचन योजनेतून वंचित असलेल्या गावांना पाणी मिळावे ,माढा तालुक्यातील पाण्यापासून कायम वंचित धानोरे व परिसरातील गावांना पाणी मिळावे यासाठी सर्वे करून प्रस्ताव पाठवण्याचे धोरण ठरले .जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी पाठवलेले प्रस्ताव आपण मंत्रालय स्तरावर मंजूर करून घेऊ असा शब्द आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिला .

आष्टी उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर आहे .या योजनेसाठी आणखी १२५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे बैठकीत ठरले .माळशिरस तालुक्यात जलसंपदा विभागाकडून मेकॅनिकल सबडिव्हिजन मंजूर होण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांनी जोर धरला .

त्यावर तालुक्यासाठी असे सबडिव्हिजन देण्यात येईल असे अतुल कपोले यांनी सांगितले .माळशिरस तालुक्यातील निरा व भीमा नद्यांवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी नवीन बर्गे देण्यात येणार आहेत . उजनी उजवा कालव्याच्या १ ते ४३ मैलामध्ये बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचे ठरले .गिरझणी येथील तलावाच्या मुख्य दरवाजाचे दुरुस्तीचे काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिला .

या बैठकीसाठी पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुनाळे ,विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता एम. टी . धुमाळ . पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप ,सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे ,अधीक्षक अभियंता रामेश्वर बागडे ,अधीक्षक अभियंता कोल्हे ,कार्यकारी अभियंता संजय बोडके ,कार्यकारी अभियंता डुबल , माजी आमदार नारायण पाटील ,जलतज्ञ अनिल पाटील ,शिवाजी कांबळे ,शिवतेजसिंह मोहिते पाटील ,जगदीश अग्रवाल ,अमरजीत साळुंखे , दीपक देशमुख , प्रा . शिवाजी बंडगर ,गोविंद पवार ,अजित तळेकर ,प्रकाश पाटील ,बाबाराजे देशमुख , प्रतापराव पाटील ,मामा पांढरे , जयंत पाटील ,महेंद्र पाटील , अजित तळेकर आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

नीरा देवघर धरणाच्या पाण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून पाठपुरावा सुरू आहे . या योजनेसाठी माळशिरस तालुक्याला २ . ८८ टीएमसी पाणी मंजूर आहे .त्यामध्ये तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे .आता ही योजना बंदिस्त पाईपलाईन द्वारा करण्यात येणार असल्याने या योजनेचे १. १० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे ते त्या परिसरातील बारा गावांना देण्यात यावे अशी मागणी आमदार रणजितसिंह व आमदार सातपुते यांनी लावून धरली .यासंदर्भात तत्काळ सर्वेक्षण केले जाईल असा शब्द अधिकाऱ्यांनी दिला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button