लोकप्रिय वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
जन्म. ११ मे चेहऱ्यावरचे भाव,कपडे,बॉडी लँग्वेज,बोलणं अशा अनेक गोष्टींचं भान बाळगत शांतपणे आणि गांभीर्याने बातम्या देणं हे वृत्त वाहिनीच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीही महत्त्वाचं असतं.ही तारेवरची कसरत समर्थपणे करून प्रेक्षकांच्या ओळखीचं बनलेलं नाव म्हणजे ज्ञानदा कदम…
‘एबीपी माझा’ हे ‘स्टार माझा’ होतं तेव्हापासून ज्ञानदा कदम त्यांच्यासोबत आहे,या मार्च २०२० मध्ये ज्ञानदा कदमला ‘एबीपी माझा’त काम करायला सुरुवात करून तेरा वर्ष पूर्ण झाली.तेरा वर्षांपूर्वी रिपोर्टर म्हणून रुजू झालेल्या ज्ञानदाने आज चीफ अँकर पदापर्यंतचा पल्ला गाठलाय…
हा प्रवास करत असताना तिने प्रेक्षकांच्या मनात सुद्धा एक हक्काचं स्थान निर्माण केलंय.आपली स्वतःची स्टाईल आणि बोलण्यातला कॉन्फिडन्स या जोरावर ज्ञानदाने तिचं वेगळं स्थान इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात स्थापित केलंय.माध्यमाची विद्यार्थिनी असलेल्या ज्ञानदा कडे ‘स्टार माझा’मध्ये रुजू होण्याअगोदर काही महिने आकाशवाणीसाठी आणि प्रिंट मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव ज्ञानदापाशी होता…

आकाशवाणीवर तिचा आवाज कधी ऐकायला मिळाला नाही तरी तिला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘आकाशवाणीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पाहुणे येत असायचे.त्यांच्याशी कसं बोलायचं,तांत्रिक बाजू कशा सांभाळायच्या,बॅक ऑफिसला काय काय कामं असतात हे तिला आकाशवाणीच्या आठ महिन्यांनी शिकवलं.पत्रकारितेचा कोर्स करून ज्ञानदा कदम २००७ मध्ये ‘स्टार माझा’ला जोडली गेली.२००७ मध्ये ‘स्टार माझा’ सारख्या त्या वेळच्या नव्या मराठी न्यूज चॅनलमध्ये रुजू होत असताना सुरुवातीला एज्युकेशन फिल्डमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी ज्ञानदाने वर्षभर व्यवस्थित सांभाळली…
बातम्या कश्या शोधायच्या ? कॅमेरा कसा हँडल करायचा ? स्टोरी कशी बनवायची ? फिल्डवर शूट कसं करायचं ? स्टोरीचं स्क्रिप्ट,एडिटिंग या सगळ्याच गोष्टी शिकत वर्षभरातच रिपोर्टिंगच्या कामात तिचा जम बसला.याच दरम्यान अँकरिंगची संधीही तिच्याकडे चालून आली. सुरुवातीला फक्त रविवारच्या एका कार्यक्रमाचं अँकरिंग करणाऱ्या ज्ञानदाला आज कित्येक तास अगदी कॉन्फिडन्टली न्युज रूम सांभाळत असताना आपण पाहतो. रिपोर्टिंग की अँकरिंग यापैकी एक क्षेत्र निवडण्याची वेळ आल्यावर तिने अँकरिंगचा पर्याय निवडला…
तेव्हा पासून पूर्णवेळ फक्त अँकरिंगचंच काम तिने सुरू केलं. या क्षेत्रात काम करत असताना येणारी आव्हानं आणि त्यांना सामोरं जाण्याचं तंत्रही तिने या काळामध्ये अवगत केलं. अनुभवांमधून घडत गेलेल्या ज्ञानदाचं सहज आणि हटके स्टाईलने अँकरिंग लोकांना बातम्या पाहायला प्रवृत्त करतं. न्युज बुलेटिनसारखा चॅलेंजिंग शो ज्ञानदा कोणतंही दडपण न घेता हसतमुखाने पार पाडते. मुद्देसूद प्रश्न विचारुन अनेक विचारवंतांसोबत गंभीर विषयांवरची चर्चासत्रे ज्ञानदाने संयमाने हाताळली आहेत…
‘माझा कट्टा’ सारख्या शोमध्ये अगदी मोजक्याच शब्दात प्रेक्षकांना मुलाखतीशी जोडून ठेवणारा दुवा ती बनते.विभिन्न क्षेत्रातील कित्येक दिग्गजांच्या मुलाखती घेताना तिची देहबोली कमालीची आत्मविश्वासपूर्ण वाटते.बातमीचं गांभीर्य ओळखून, स्वतःच्या बोलण्याच्या शैलीत आवश्यक ते बदल करून अनेक ब्रेकिंग न्यूज ती आपल्यापर्यंत मागील दहा वर्ष पोहचवत आली आहे…
वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम घेऊन ज्ञानदा मराठी प्रेक्षकांसमोर आली आहे. “मराठी बिग बॉस” या शोमधून महिला उद्योजकांच्या घेतलेल्या मुलाखती,महापालिका निवडणुकांच्या दरम्यान केलेला “रणसंग्राम रणरागिनींचा” हा कार्यक्रम तिच्यातील वेगळ्या कौशल्यांची चुणूक दाखवतात. हुंड्याला विरोध,आरक्षण,माझी शाळा,दुष्काळ परिषद,महापूर अशा अनेक संवेदनशील विषयांना तिने या काळात न्याय दिला आहे.
ज्ञानदाला पत्रकारिता जमली नसती तर तिच्याकडे घरच्यांनी पर्यायही दिलेले होते. तिचे आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते,आजी शिक्षिका होती,त्यामुळे ‘काही वेगळं करायला जमलं नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात येऊ शकतेस,’ हा सल्ला तिच्यासाठी कायमच होता.
मात्र ज्ञानदाने निश्चयाने तिला हवं तसं इतरांपेक्षा ‘वेगळं’ करिअर घडवण्यासाठी लागेल ती सगळी मेहनत घेतली…
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क तर्फे ज्ञानदा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…



