महेंद्र सोळंकी या वनपाला विरुद्ध वसई मांडवी पोलीस ठाण्यात लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
नवीन घरकुल बांधणी करण्याकरिता व सुरू असलेले बांधकाम बंद न पाडण्याकरिता घरकुल लाभार्थी धारकाकडून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वसई गणेशपुरी मांडवी येथील वनपाल यांच्या विरुद्ध अँटी करप्शन पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी वसई मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वसई मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील कोशीमशेत गावातील एका (33) वर्षीय इसमाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाकरिता अनुदान मंजूर झाल्याने ते सध्या राहत असलेल्या घरासमोरील जागेत त्यांनी घरबांधणी सुरू केली असून त्याकरिता त्यांनी घर बांधणीचा परवानगी अर्ज गणेशपुरी वनविभागाच्या कार्यालयात केला आहे.
हे नवीन घरकुल बांधणी करण्याकरिता व सुरू असलेले बांधकाम बंद न पाडण्याकरिता महेंद्र भबुतराव सोलंकी पद वनपाल वर्ग 3 नांदणी वाडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गणेशपुरी मांडवी स्थित- तालुका वसई जिल्हा पालघर यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती याबाबत तक्रारदार यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी या वनपलाची तक्रार पालघर अँटीकरप्शन कार्यालयात केली होती.
याबाबत अँटी करप्शन विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी शिवराज पाटील पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र, सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र व संजय गोहिलकर अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पडताळणी केली असता वनपाल महेंद्र सोलंकी यांनी तक्रारदार यांच्याकडे एका कागदावर 30,25, 20, असा आकडा लिहून देऊन चर्चे अंतिम 20,000 रुपये लाचेची मागणी करून ती तक्रारदार यांच्या घरी येऊन स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्यावर महेंद्र सोळंकी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 ( सुधारित अधिनियम 2018) चे कलम 7 प्रमाणे मांडवी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



