महाराष्ट्र

रोजा सोडण्याची प्रक्रिया -इफ्तार

रमजानुल मुबारक क्रमश – ४

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

रमजान महिन्यात रोजे धरतांना पहाटे केले जाणारे जेवण अथवा कोणत्याही स्वरूपाचे खाणे पिणे हे सहेरी म्हणून संबोधले जाते तर सायंकाळी सूर्यास्तानंतर लगेचच उपवास सोडण्याची प्रक्रिया ही इफ्तार म्हणून ओळखली जाते.इफ्तार म्हणजे रोजा सोडणे. पहाटे सहेरी नंतर दिवसभर काहीही न खाता पिता रोजा धरला जातो.तर सायंकाळी रोजा इफ्तार केला जातो.यावेळी रोजेदाराची अवस्था पाहण्यासारखी असते. दिवसभर उपाशी राहून, कामधंदा करुन तो थकलेला असतो. शेवटच्या तासातील एक एक मिनट त्याला जड झालेला असतो.पण अल्लाहच्या आदेशाचे पालन केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते.इफ्तार पूर्वीची वेळ दुआ मागायची असते.घरी कुंटुंबासमवेत किंवा मशिदीत सामुहिक पणे दुआ मागितली जाते.

रोजा हा अल्लाह साठी असल्याने त्याच्याशीच दुआच्या माध्यमातून संवाद साधला जातो. प्रेषित हजरत मुसा अलैसलाम यांनी एक दिवस अल्लाहला प्रश्न केला कि हे परवर दिगार,मी तूझा पैगंबर असून तूझ्याशी थेट संवाद साधत असतो, माझ्यापेक्षा आणखी कुणी असा तूला जवळ आहे का ? अल्लाहने उत्तर दिले कि उम्मते मोहमदीमधील रोजेदार इफ्तार करण्यापूर्वी ज्यावेळी दुआ च्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधतील तेव्हा ते तूझ्यापेक्षा ही माझ्याशी जवळ असतील. इफ्तारच्या वेळी मागितलेली दुआ कधी रद्द होत नाही म्हणून रोजा इफ्तार करण्यापूर्वी अत्यंत विनवणी पूर्वक परमेश्वराकडे दुआ मागितली पाहिजे.

इफ्तार प्रसंगी सर्वत्र रौनक काही औरच असते.बाजारात, चौकाचौकात इफ्तारसाठी खाद्यपदार्थ तसेच फळे घेण्याची धावपळ सुरू असते, घराघरात स्वयंपाकाची तयारी होत असते. खजूर,फळे,सरबत याबरोबरच वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात.इफ्तार पूर्वी घरात दस्तरख्वान वर सर्व मांडले जातात. दुआ केली जाते.परंतु निर्धारित केलेल्या वेळेत एक मिनिट जरी बाकी असेल तरी कोणत्याही पदार्थाला किंवा पाण्याच्या पेल्याला हात लावला जात नाही याला तक्वा म्हणतात. अल्लाहच्या आदेशाचे पालन करणारा इतका स्वयंशिस्तीचा कायदा जगाच्या पाठीवर कुठेही नाही,जो इफ्तारच्या वेळी पाळला जातो.इफ्तारसाठी मशिदीतून व्यवस्था केली जाते. बाहेरगावचे मुसाफिर, शहरातील रुग्णालयात ॲडमीट रुग्णाचे नातेवाईक यांच्या इफ्तारीची व्यवस्था मशिदीमध्ये केली जाते. अनेक लोक सवाब (पुण्य)मिळावा या भावनेने इफ्तारचे साहित्य आणून देतात. यात सर्वधर्मिय बांधव असतात.इफ्तारची सर्वात मोठी व्यवस्था मक्कामधील हरम शरीफ मध्ये केली जाते. जगातील सर्वच देशांचे प्रमुख रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.व्हाईट हाऊस, क्रेमलीन पासून राजभवनापर्यंत ती दरवर्षी ती केली जाते व यातून परस्परांबद्दल स्नेह,आदर यांचा संदेश दिला जातो.

(क्रमशः)

सलीमखान पठाण

9226408082.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button