पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील भवानगडावर सह्याद्री मित्र परिवाराने राबवली स्वच्छतेची विजयादशमी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील ‘सह्याद्री मित्र परिवार’ या दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थेने 2024 यावर्षी ‘भवानगड’ किल्ल्यावर 12 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छता मोहीम राबविली.
या मोहिमेसाठी माकुणसार, केळवे, मथाणे,खारेकुरण, बोईसर आणि विरार येथून आलेल्या तब्बल 25 तरुण-तरुणींनी गडावरील वाढलेले गवत आणि तिथला केरकचरा यांची स्वच्छता करून, झेंडूची तोरणे, रांगोळी – फुलांची आरास करून, शस्त्र पूजन करून छत्रपती शिवराय, नरवीर चिमाजी आप्पा आणि ज्ञात अज्ञात वीरांना मानवंदना देऊन किल्ल्यावर “दसरादुर्गोत्सव” हा अनोखा कार्यक्रम साजरा केला.
पूर्वी पावसाळा संपल्यावर गडदुर्गांवर गवताची सफाई करुन किल्ल्यावर आनंदाचा जल्लोष करण्याची परंपरा होती. कालांतराने किल्ल्याचे महत्त्व कमी झाल्यानंतर ही परंपरा कालबाह्य होऊ लागली होती. मात्र, आता पुन्हा अलीकडे स्वच्छतेच्या या अनोख्या उपक्रमास ऊर्जितावस्था देत किल्ल्यावर दसरा सण साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर दुर्गप्रेमी संस्थांमार्फत आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून हीच प्रथा पालघर जिल्ह्यातील अनेक गडकोटांवर सह्याद्री मित्र संस्थेचे शिलेदार राबवित आहेत.
पालघर परिसरातील अनेक गडकोट नामशेष होण्याच्या मार्गावर असताना भवानगड आपले अस्तित्व बर्यापैकी राखून आहे. या गडाची संवर्धनाच्या हेतूने जागृती व्हावी, स्वच्छता राहावी आणि पर्यटकांकडून गडाचे पावित्र्य जपले जावे म्हणून सदर मोहिम दरवर्षी राबिण्यात येते.
भवानगड किल्ल्याचा ज्ञात- अज्ञात इतिहास आणि दुर्गसंवर्धन चळवळीची गरज यावेळी सह्याद्री मित्र परिवाराचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी व्यक्त केली. गडकिल्ल्यांवरील अशा प्रकारचे उपक्रम नक्कीच बालवर्ग आणि तरुण मंडळींसाठी संस्कारक्षम ठरू शकतात आणि परिसरातील अधिकाधिक तरुणांनी अशा उपक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. अशा भावना मार्गदर्शक भुपेश म्हात्रे यांनी व्यक्त केल्या.
स्थानिक तरुणांनी किल्ल्याच्या जतनीकरणाची प्रामाणिक जबाबदारी घेतल्यास काहीच अशक्य नाही असा विश्वास संस्थेचे उमेश पाटील व निकेश पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वैद्य यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद पाटील, तुषार ठाकुर, प्रतिश किणी, संतोष पाटील, विकास खोले, स्वजित राऊत, दीप्ती पाटील, विजया पाटील, मिरीता पाटील आणि जया ठाकुर इत्यादी सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.