परंपरेचे दर्शन भोंडल्याच्या कार्यक्रमातून घडते – अमोल फुले
अकलूज प्रतिनिधी – तात्यासाहेब काटकर
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात परंपरेनुसार नवरात्री निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या मार्गदर्शनाखाली भोंडला कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मैदानाच्या मध्यभागी मोठा टेबल ठेवून त्यावर रांगोळी व फुलांच्या माध्यमातून सुंदर हत्तीची प्रतिमा काढून त्या हत्तीचे पूजन करण्यात आले. व त्यांच्या भोवताली फेर धरून मुलींनी व शिक्षिकांनी भोंडला गीतावर ताल धरला. महाराष्ट्रीयन परंपरेचे दर्शन भोंडल्याच्या कार्यक्रमातून घडले. भोंडला किंवा हादगा. ही एक महाराष्ट्रीयन परंपरा आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ती साजरी केली जाते. संस्कृती व परंपरेचा वारसा टिकण्यासाठी भोंडलासारख्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले.
या भोंडला कार्यक्रमात जवळपास विद्यालयातील १२०० मुली, शिक्षिकांनी सहभाग घेतला होता. एलोपा पैलोमा गणेश देवा…माझा खेह मांडू दे करीन तुझी सेवा, अक्कण माती चिक्कणमाती अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा… गुलाबी साडी… अशी अनेक गाणी म्हणत फेर धरून मुली नाचत होत्या. पूर्वीच्या काळी महिलांनी चूल आणि मूल या पलीकडे काही जगच नव्हते. अशा वेळी या सणाच्या निमित्ताने महिला आपल्या सखींना भेटून एकमेकींच्या सुख दु:ख वाटायच्या.
खरे तर आज आधुनिक कामात वेगवान जीवन जगताना स्पर्धा-ताणतणाव यातून मुक्त होण्यासाठी आणि दोन घटका आनंद प्राप्तीसाठी ‘पारंपरिक पद्धतीचा भोंडला’ नव्या युगात तरुण मुली व स्त्रियांनाही आनंद देत असतो. सरते शेवटी शाळेकडून राजगीर लाडूंची खिरापत वाटली. सदर कार्यक्रमाचे नियोजन उच्च माध्यमिक विभागाती सर्व महिला शिक्षकांनी केले. सदर भोंडला कार्यक्रमास माता पालक संघाच्या सदस्या रूक्मिणी शिंदे, दिपाली लोखंडे, अनुराधा निंबाळकर, अर्चना दसरे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य झाकीर सय्यद, शिंदे सर व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.