संपादकीय

नव्या इमारतीत उच्चवर्णीय व उच्चवर्गीयांचे दल्ले– आणि बहुजन समाजासमोर जूनेच वांदे–ॲड.शीतल शामराव चव्हाण

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

हा भाकरीचा जाहीरनामा,
हा संसदेचा रंडीखाना,
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत

भारतीय संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाची, त्यावरुन उठलेल्या वादंगाची चर्चा सर्वत्र सुरु होती आणि माझ्या डोक्यात विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या वरील ओळी सातत्याने घोंगावत होत्या. अखेर सगळे आक्षेप व सगळे वाद अजगराप्रमाणे गिळून नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन काल पार पडले.

आपला देश १९४७ साली स्वतंत्र झाला. १९५० पर्यंत देशाच्या संविधानाची निर्माण प्रक्रिया सुरु होती. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान अस्तित्वात आले. -आम्ही भारताचे लोक – या शब्दांनी संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. भारताचे संविधान हे भारतातल्या तमाम लोकांनी स्वत:लाच अर्पण केले. अशाप्रकारची प्रस्तावना आणि अर्पणपत्रिका असणारे भारतीय संविधान हे जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय संविधान आहे. जगाने आदर्श घ्यावा, प्रेरणा घ्यावी असे अनेक महामानव भारतात होवून गेले. यापैकी कुठल्याही महामानवाला हे संविधान अर्पण करता आले असते. पण लोकशाही ही खऱ्या अर्थाने लोकांची आहे, हा देश व या देशातील तमाम संसाधने सर्वांची आहेत हे दर्शवणारी ही अर्पणपत्रिका आहे.

हा देश एकजिनसी नाही. कितीही प्रयत्न केले तरी तो तसा होणे शक्य नाही. — या देशात हिंदू आहेत, मुसलमान आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, पारसी आहेत, ख्रिश्चन आहेत, कबीरपंथी आहेत, महानुभावपंथी आहेत, शैवपंथी आहेत, वैष्णवपंथी आहेत, लिंगायत आहेत, जैन आहेत, जैनातही पुन्हा दिगंबरपंथी व श्वेतांबरपंथी आहेत, वारकरी आहेत, नाथ सांप्रदायी आहेत, देवाचे अस्तित्व मान्य करणारे आस्तिक आहेत,

देवाचे अस्तित्व नाकारणारे नास्तिक आहेत, अज्ञेयवादी आहेत, संभोगातून समाधी मिळते असेही मानणारे आहेत. पुरुष आहेत, महिला आहेत, तृतियपंथी आहेत, स्वेच्छेने लिंग परिवर्तन करुन घेतलेले आहेत, आदीवासी आहेत, भटके-विमुक्त आहेत, विवाहसंस्था मानणारे आहेत, ती न मानणारे आहेत, हिप्पी आहेत, समलिंगी संबंध मानणारे आहेत, ते न मानणारेही आहेत. विविध भाषा बोलणारे आहेत, महिनोनमहिने-वर्षानुवर्षे मौन पाळणारेही आहेत. विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करणारे आहेत. कसलीच वेशभूषा न घालता नागडे राहण्यात धार्मिकता शोधणारेही आहेत. वैदिक परंपरेला मानणारे आहेत, अवैदिक परंपरेला मानणारेही आहेत. जंगलात राहणारे आहेत, शहरात राहणारे आहेत, गावखेडी, वस्त्या, टापू, समुद्रकिनारे, डोंगरखोरे, पहाड अशाठिकाणीही राहणारे आहेत. भारत हा महाकाय देश आपल्या पोटात अशी अनंत प्रकारची विविधता सामावून घेणारा आहे. ही विविधता आणि अशा विविधतेत जगत असतानाही ‘भारतीय’ ही एकच ओळख असणे हेच भारताचे खरे सौंदर्य आहे.

अशा विविधतेत जगणाऱ्या भारतीयांचे प्रतिनिधीत्व लोकांनी निवडून दिलेले खासदार संसदेत करीत असतात. म्हणून संसद ही कुठल्या एका धर्माचे, जातीचे, प्रांताचे, भाषेचे, वर्गाचे, वर्णाचे, विचाराचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था राहत नाही. तर ती तमाम भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारी देशाची सर्वोच्च संस्था ठरते. संविधान हे या संस्थेच्या कार्यपद्धतीचे दिशादर्शक व मार्गदर्शक दस्तऐवज ठरते.

गुजरातच्या क्रूर हिंसाचाराचे (खल)नायक नरेंद्र मोदी यांना देशात हिंदूत्वाचे राजकारण करणाऱ्या संघ-भाजप परिवाराने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आणले. जेव्हा मोदींना देशाचे नेतृत्व म्हणून समोर आणले गेले तेव्हा ‘हिंदूत्वाऐवजी विकास’ हा ‘अजेंडा’ लोकांसमोर ठेवला गेला होता हे लक्षात घेतले पाहिजे. कारण, प्रचंड बहुविधता असलेल्या या देशात केवळ ‘हिंदूत्वाच्या’ नावाखाली सत्तेत येणे शक्य नाही हे तेही जाणून होते. म्हणून, दिर्घकाळ सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे, कॉंग्रेसविरोधी आंदोलनाला प्रायोजित करणे आणि विकासाचे फसवे ‘मॉडेल’ उभे करुन लोकांची मते मिळवणे अशा मार्गाने संघ-भाजप सत्तेत आली. या सगळ्या प्रक्रियेत अविवाहित असलेले (आणि म्हणून त्यांना कसलाही स्वार्थ नाही असा समज निर्माण केलेले) नरेंद्र मोदी हे या फसव्या विकास अजेंड्याच्या नेतृत्वस्थानी राहिले.

ओठावर राम आणि मनात-डोक्यात नथुराम --अशा वृत्तीच्या संघ-भाजपाने सत्तेची पकड घट्ट होताच आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. आरबीआय, सीबीआय, ईडी, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग अशा स्वायत्त संस्थांच्या गळ्यात पट्टे बांधून त्यांना आपल्या सोयीनुसार हाकण्यास सुरुवात केली. नोटाबंदी, नियोजन नसताना अमलात आणलेली जीएसटी करप्रणाली, प्रचंड वेगाने वाढणारी महागाई, जगात क्रूड ऑईलचे दर घसरलेले असतानाही वाढणाऱ्या इंधन तेलाच्या किमती, बेरोजगारी याने जनता बेचिराख झाली. लोकांना दैनंदिन जीवनातील अडचणींत गुंतवून ठेवून संघ-भाजपाने आपला 'हिंदूत्वाचा' विखारी 'अजेंडा' राबवण्यास सुरुवात केली. वैदिक संस्कृतीचे प्रतिक असलेली स्त्री भारतमाता म्हणून सबंध देशावर लादणे, इतिहासाचे विकृतीकरण करणे, माफीवीराला  स्वातंत्र्यवीर म्हणून मिरवणे, सच्च्या स्वातंत्र्यसनिकांना व हुतात्म्यांना विस्मृतीत ढकलणे, हा देश खऱ्या अर्थाने २०१४ सालीच स्वतंत्र झाला असा समज पसरवणे, देशाचे महत्वाचे पुरस्कार कर्तृत्वशून्य व्यक्तींना देणे, बहुजन समाजातील महामानवांचा अपमान करणे, काश्मीर फाईल्स-केरळा स्टोरी अशा चित्रपटांच्या निर्मितीला प्रायोजित करुन त्याद्वारे समाजात धार्मिक ताणतणाव व भेद निर्माण करणे, पुलवामा सारखी प्रकरणे घडवून आणून आणि सैनिकांची नावं घेवून मतं मिळवणे, सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे, मुस्लिमांना पाकीस्तानात जाण्यास सांगणे असे 'क्रूर हिंदूत्वाचा' अजेंडा राबवणारे अनेक प्रकार करण्यास सुरुवात केली. काही आंधळ्या धर्मभक्तांना व देशभक्तांना धर्माच्या व तथाकथित देशभक्तीच्या अफूने गुंगवत ठेवून आणि त्यांच्यामार्फत आपल्या सरकारची 'वाहवाई' करवून घेत दुसऱ्या हाताने मात्र उद्योगपतींची कोट्यावधीची कर्जे माफ करणे,

भांडवलदारधार्जिने धोरण

अवलंबणे, अंबाणी-अदाणींना या देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती व मनुष्यबळ लुटण्यास मोकळे सोडणे, शेतकरी व कामगारविरोधी धोरणे आखणे, फायद्यात असलेल्या सार्वजनिक कंपण्यांचेही खाजगीकरण करुन त्या काही ठराविक उद्योगपतींच्या घशात घालणे असा सगळा बाजार चालवला आहे.
मनमाड येथे रेल्वे कामगारांसमोर दिलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशाला दोन प्रमुख शत्रूंपासून धोका आहे. पहिला शत्रू आहे ब्राह्मण्यशाही आणि दुसरा शत्रू आहे भांडवलशाही.- बाबासाहेबांची हीच भूमिका आपल्या पोवाड्यातून मांडताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणाले होते

धनवंतांनी अखंड पिळलेI धर्मांधांनी तसेच छळले ।
मगराने जणू माणिक गिळिलेI
चोर जाहले साव ।।

धनवंत आणि धर्मांधांची क्रूर युती म्हणजे आज सत्तेत बसलेली संघ-भाजप होय.
दुर्दैवाने या संघ-भाजपाच्या धोरणांचा खुलासा करणारे, त्यांचे पितळ उघडे पाडणारे आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करणारे सक्रिय विरोधक आज देशात उरले नाहीत. कॉंग्रेसच्या राहुल गांधींनी भारतभर यात्रा काढून आणि एकाचवेळी सावरकर व अदाणीबाबत स्पष्ट भूमिका मांडून तो प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्याच पक्षातील नेते आणि सहकारी पक्षातील नेते साथ देत नाहीयेत, एकटे पाडत आहेत. महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या सभेत वैदिक संस्कृतीचे प्रतिक असलेल्या, हातात ॐ लिहिलेले भगवे ध्वज घेतलेल्या भारतमातेचे पुजन ‘मविआ’च्या नेत्यांनी केले. ही भारतमाता महाविकास आघाडीचे दैवत आहे असेही सांगण्यात आले. हिंदू-ब्राह्मणी विषमतावादी संस्कृतीला तमाम देशवासीयांवर लादणारी प्रतिके संघ-भाजपाने मांडली आणि आज त्याच प्रतिकांचा स्विकार संघ-भाजपाचे विरोधकही करताना दिसत आहेत. याचाच अर्थ संघ-भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यातील लढाई ही केवळ राजकीय सत्तेसाठीची लढाई असून त्याला या देशातील सांस्कृतिक संघर्षाचा, समतावादी व मानवतावादी विचारधारेचा कसलाही स्पर्ष नाहीये.
भारतीय संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाची घोषणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार हे जाहीर झाले. काल हे उद्घाटन पार पडले.
*विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उद्घाटन सोहळा पार पडला. ज्या व्यक्तीने इंग्रजांकडे दयेची भीक मागून सुटका करुन घेतली, ज्या व्यक्तीने मरेपर्यंत इंग्रजांची पेंशन खाल्ली, ज्या व्यक्तीच्या संघटनेतील लोकांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या खबरी इंग्रजांना पुरवल्या, ज्या व्यक्तीने शिवराय-शंभूराजे या महामानवांना आपल्या लिखानातून दुय्यम लेखले, जो व्यक्ती गांधी हत्येच्या केसमधील आरोपी होता आणि ज्या व्यक्तीने लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षतेवर आधारित व्यापक व सर्वसमावेशक राष्ट्रवाद नाकारुन संकुचित अशा हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडली त्या व्यक्तिच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले यावरुन या नव्या इमारतीत कुठली धोरणे आखली जाणार आहेत, कुणाच्या हिताचे राजकारण केले जाणार आहे हे स्पष्ट होते. एकीकडे संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होत होते आणि दुसरीकडे भाजपाच्या खासदाराने केलेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटू महिलांचे आंदोनल पोलिसी बळाचा वापर करुन चिरडले जात होते. देशाच्या संसदेच्या नव्या इमारतीत न्यायाला पायदळी तुडवणारे असे क्रूरकर्मा बसणार आहेत याचेही दर्शन उद्घाटनाच्या दिवशीच होत होते.

संसदेच्या नव्या इमरतीच्या उद्घाटनाचा विधी वैदिक मंत्रोच्चाराने करण्यात आला.

भारताचे संविधान वैज्ञानिक दृष्टीकोण रुजवण्याला प्राधान्य देते. हे संविधान संपूर्णत: धर्मनिरपेक्ष असून नागरीकांना धार्मिक आचरणाची मुभा असली तरी राज्याचे कामकाज चालवताना ते धर्मनिरपेक्षपणे चालवण्याची दिशा देणारे आहे. विविध धर्मियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन हे एका विशिष्ट धर्माच्या विधीद्वारे करणे हे संविधानिक तत्वांची पायमल्ली करणारे कृत्य आहे. ही इमारत नरेंद्र मोदींच्या खाजगी मालकीची इमारत असल्याचाच भास हा सबंध सोहळा पाहताना होत होता. तशाप्रकारचेच वातावरण निर्माण करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा मंत्रोच्चाराऐवजी संविधानाच्या प्रस्तावनेचे आणि संविधानातील महत्वाच्या तरतुदींचे वाचन करुन पार पाडता आला असता. पण ठराविक संस्कृती सबंध देशावर लादण्याच्या कुविचाराने झपाटलेल्या संघ-भाजपाने संविधानातील तत्वे पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराला आक्षेप न घेता केवळ मोदींच्या हस्ते उद्घाटन नको या एकाच मुद्यावर विरोधकही अडून राहिले.
संविधानाने राज्य कसे चालावे याची मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यात सामाजिक-आर्थिक-राजकीय न्यायाचा, समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळवून देण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टीकोण रुजवण्याच्या तत्वांचा अंतर्भाव आहे. या सगळ्याला बगल देवून संघी थाटात संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले ही देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला काळीमा फासणारी घटना आहे.
संसदेची इमरात नवी झालेली असली तरी या देशातील जनतेला जून्याच संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. देशाच्या सर्व क्षेत्रातील उच्चवर्णीयांचे वर्चस्व, उच्चवर्णीयांच्या हिताची असलेली संस्कृती तमाम बहुजनांवर व श्रमिकांवर लादणारा सांस्कृतिक दहशतवाद आणि देशातील धनदांडग्यांकडून होणारे सर्वसामन्यांचे शोषण याच व्यथा तमाम भारतीयांच्या पदरी असणार आहेत. संसदेची इमारत नवी झाली म्हणून या देशातल्या उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक दहशतवाद संपूष्टात येणार नाही की धनिकांची लूटशाही थांबणार नाही.
देशाच्या संसदेची इमारत नवी पण देशातील जनतेचे वांदे जूनेच हे खरे वास्तव असणार आहे. सामान्य लोकांकडून जमवलेल्या कररुपी पैशातील अब्जावधी रुपये खर्चून संसदेची नवी इमारत उभी झाली. पण ती एकट्या मोदींमूळे उभी झाल्याचा समज निर्माण करुन राजेशाही थाटात लोकशाहीच्या वास्तूचे उद्घाटन झाले. या नव्या इमारतीत उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांचे दल्ले आपले जूनेच मेंदू घेवून जाणार आहेत. ते देशातल्या श्रमिक, बहुजन समाजासनोर जूनेच वांदे निर्माण करुन ठेवणार आहेत. म्हणून इमारत नवी झाल्याच्या बातम्या वाचून फार हुरळून जाण्याचे कारण नाही.
नव्या इमारतीच्या पायथ्याला ज्या संविधानिक मूल्यांचे दफन करण्यात आले त्या मूल्यांची प्रतिष्ठापना करणारा दिवस हाच आपला सुवर्णदिवस असणार आहे आणि संविधानाच्या तत्वानुसार देश चालेल असा काळ हाच आपला अमृतकाळ असणार आहे.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button