पित्याचे छत्र नसताना पालघर वडवलीतील नीलिमा आणि मनीषा या दोन सख्या बहिणींची पोलीस दलात यशस्वी निवड

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुका वडवली (डोंगरीपाडा) येथील कै. दिलीप धर्मा शनवार यांच्या दोन मुली नीलिमा दिलीप शनवार आणि मनिषा दिलीप शनवार यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि कठोर परिश्रमाच्या आधारे 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात निवड होण्याचा मान मिळवला आहे.
या ऐतिहासिक घडामोडीने शनवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
नीलिमा शनवार यांची कोल्हापूर जिल्ह्यात, तर मनिषा शनवार यांची सातारा जिल्ह्यात पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. ही यशस्वी कामगिरी विशेषतः उल्लेखनीय आहे, कारण वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही दोघींनी जिद्द न सोडता पोलीस भरतीच्या कठीण मार्गावर पुढे जाण्याचा निर्धार केला.

शनवार कुटुंबाने या प्रवासात त्यांना मोठा आधार दिला. आई देवलू शनवार, आत्या सरिता शनवार, काका जयेश शनवार, आणि भाऊ अक्षय शनवार यांनी या दोघींना संपूर्णपणे पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले. तलासरी येथील दीप अकॅडमी या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात नीलिमा आणि मनिषा यांनी वर्षभर कसून तयारी केली. अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि लेखी परीक्षेचा संपूर्ण सराव केला.
वडिलांचे निधन झाल्यानंतर आर्थिक तंगीमुळे मोठी बहीण मनिषा हिने काही काळ वडवलीतील ‘सेट्स कंपनी’त महिना फक्त 6000 रुपये पगारावर काम केले. परंतु, या कठीण परिस्थितीतही मनिषा आणि नीलिमा यांनी आपली स्वप्ने जिवंत ठेवली. प्रचंड जिद्द, ध्येयावर लक्ष, आणि स्वतःला सिद्ध करण्याची आवड यामुळे या दोघींनी संपादन केलेल्या यशाचे कौतुक संपूर्ण तलासरी तालुक्यात केले जात आहे



