गणेशोत्सवादरम्यान सफाळे पोलिसांकडून विशेष खबरदारी…
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी “नो पार्किंग झोन” ची उपाययोजना….
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
गणेशोत्सव काळात नागरिकांची वाढती रेलचेल पाहता बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेत सफाळे पोलिसांनी यावर तोडगा काढला आहे. रेल्वे फाटक ते इब्राहिम मंजिल भागात आता 07 सप्टेंबरपासून ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले असून या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व-पश्चिम भागातील सुमारे 50 ते 55 गावापाड्यातील नागरिकांना दैनंदिन आणि सणउत्सवाच्या खरेदीसाठी सफाळे बाजारपेठे हा एकमेव पर्याय आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. अशातच दैनंदिन वाहनचालकांमुळे सफाळे रेल्वे फाटकापासून ते थेट स्टेट बँक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होतो.
यासंदर्भात सफाळे पोलिसांनी यापूर्वीच सम व विषम पद्धतीने पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र सणउत्सवाच्या वेळी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे तसेच रेल्वे फाटक बंद असल्यावर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना चालणे जिकारीचे होते. सोबतच वाहतूक पोलिसांवर देखील त्याचा ताण वाढत आहे.
याकरिता सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी वाहतूक कोंडीचा त्रास दूर करण्यासाठी 07 सप्टेंबरपासून सफाळे बाजारपेठेत “नो पार्किंग झोन” ची उपाययोजना जाहीर केली आहे.
⛔गणेश चतुर्थीच्या दिवसापासून रेल्वे फाटक ते इब्राहिम मंजिल भागात आता ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता नमूद केलेल्या ठिकाणी वाहने पार्क करू नयेत. अन्यथा संबंधित वाहनचालकावर कायदेशीर कारवाई करणार असल्याच्या सूचना सफाळे पोलिसांनी केल्या आहेत.
⛔ नागरिकांनी नियमाचे पालन केले तर सर्वांना वाहतूक कोंडीचा व रस्त्यातील अडथळ्यांबाबतचा त्रास नक्कीच दूर होईल व सर्व सफाळेवासीय आणि आजूबाजूच्या गावातील येणाऱ्या सर्वांना याचा फायदा होणार असल्याने सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
- दत्ता. के. शेळके सहाय्यक पोलीस निरिक्षक, सफाळे पोलीस स्टेशन.