२६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार
इंदापूर प्रतिनिधी समिर शेख, टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो.नं. :- 9766863786
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.
🌾 २६ जिल्ह्यांचा समावेश
कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, वर्धा तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.
💧 नुकसानभरपाई योजना
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत 13 हजार 600 रुपये पासून अनुदान देण्यात येणार आहे. त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
🌪️ अतिवृष्टीची मदत
अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे १४४ कोटी आणि २ हजार १०९ कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांचा मदत निधी दिला आहे. परंतु नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ३०७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.