पालघर जिल्ह्यातील सफाळे लालठाणे आश्रमशाळेतील बारा विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे लालठाणे माध्यमिक शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या वर्गात 244 विद्यार्थी शिक्षण घेत असून 5 ऑगस्ट 2024 रोजी रात्रीच्या जेवणातून 12 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथे दाखल केले असून या विद्यार्थ्यांवर दिवसभरात उपचार केल्याने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
रात्रीच्या वेळेला विद्यार्थ्यांना दिलेले डाळ, भात, रोटी व दुधीची भाजी खाल्याने त्या अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे. रात्रीची भाजी कडू लागत होती अशी माहिती शाळेतील विद्यार्थी ऋत्विक डावरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण मध्यवर्ती स्वयंपाक गृह कांबळगाव येथे तयार केले जाते व तेथूनच आश्रम शाळांपर्यंत विद्यार्थ्यांकरीता पोहोचवले जाते. अनेक विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण आवडत नसल्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांकडून मिळत आहे. शाळेचे मुख्याध्यापक रजेवर असल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. परंतु शाळेचे अधीक्षक देसाई सर यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता 12 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी ॲम्बुलन्सने सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी लालठाणे गावचे पोलीस पाटील संदेश पाटील , उपसरपंच जुई पाटील, सामाजिक कार्यकर्ते जतीन पाटील, माजी उपसरपंच राकेश पाटील व ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शाळेत उपस्थित होते.