सफाळे येथील विळंगी गावात टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनद्वारे सामाजिक हितोपयोगी स्तुत्य उपक्रम

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
सन्मान स्त्री शक्तीचा आणि जगतिक महिला दिनाचे औचित्य साधत विळंगी ग्रामपंचायत मार्फत सौभाग्याचे लेणं हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनद्वारे नवनवीन प्रयत्नांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पर्यावरण असो किंवा जलसंधारण असो त्यासाठी सामाजिक तत्त्वे स्वीकारून सतत पुढे जात असते.

या उपक्रमांतर्गत विळंगी गावात असलेल्या तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच सुमिता घरत, टाटा मोटर्सचे शैलेश महुलिकर, नाम फाउंडेशनचे सिईओ गणेश थोरात, संग्राम कलाते ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.विळंगी ग्रामपंचायत मार्फत आयोजित या दिमाखदार सोहळ्यात ‘सौभाग्याचे लेणं’ हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून हजारो महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून हळदी कुंकू समारंभाचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थितांना मोफत डस्टबिन वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनद्वारे तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे आणि सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.

यामुळे पुनरुज्जीवित होणाऱ्या तलावामुळे केवळ पाणीसाठ्यात वाढ होणार नसून यामुळे भूजल पातळीतही लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच घरातील नळाला रोज पाणी असावे या हेतूने गावात तीन बोरवेल मारून पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. नादुरुस्त रस्ता आणि कच्च्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम देखील सुरु झाले आहे. यामुळे ग्रामस्थांकडून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात असून या गावाचे तलाव खोलीकरण, सुशोभीकरण आणि जतन करण्याचे इंद्रधनुष्य पेलण्याचे पाऊल टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशन यांनी उचल्यामूळे विळंगी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला जाणार आहे. यासाठी या गावचे उपसरपंच तथा मनसे पालघर उपाध्यक्ष चेतन पाटील यांनी संबंधितांचे धन्यवाद व्यक्त करून विळंगी गावात स्वछता, डम्पिंग ग्राउंड, रस्ते, वीज, पर्यटन विकास, रोजगार, लोकोपयोगी कामांवर विशेष भर देणार असल्याचे टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क यांच्याशी बोलताना सांगितले.



