पालघर जिल्ह्यातील सफाळे रामबाग येथे बांबू लागवड मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

टाईम्स मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील परिसर सेवा व विकास मंडळ आयोजित पालघर तालुका कृषी खात्याच्या सौजन्याने बांबू लागवड मार्गदर्शन कार्यशाळा श्रीराम मंदिर रामबाग सफाळे येथे बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी सफाळे परिसरातील सुमारे 80 शेतकरी उपस्थित होते .
या कार्यशाळेतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विश्वास बर्वे-उपविभागीय कृषि अधिकारी पालघर यांनी बांबू लागवडसाठी लागणारी जमीन, लागवडपध्दती, शासकीय अनुदान सलग लागवड, बांधावर लागवड, 3 दिवसांचे प्रशिक्षण, वयोमर्यादा, लाभार्थ्याची आवश्यक माहिती, जिल्हा समितीतर्फे प्रस्ताव मंजूरी आदिवाबत सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली.

त्याचप्रमाणे डॉ.दहिफळे-प्रभारी अधिकारी कृषिसंशोधन केंद्र पालघर यांनी बांबू – किड व रोग न लागणारी वनस्पती असून निसर्गाचे संवर्धन करणारी जात आहे. बांबूच्या सुमारे 300 जाती असून त्यापैकी ‘’माणगा’’ ही जात उत्कृष्ठ असून चांगले उत्पन्न देणारी जात आहे या बांबू लागवडीसाठी आपल्या परिसरातील जमीन व वातावरण पोषक आहे. शेतकऱ्यांना सधून करणारे पीक म्हणजे बांबूचे पिक आहे. या बांबूची वाढ 5 वर्षांनी पूर्ण होते. या लागवडीसाठी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. या बांबुची लागवड करण्यासाठी चटाळे येथील भूषण वर्तक या शेतकऱ्यांनी 300 खड्डे खणुन शेणखत माती, खते भरून खड्डे तयार केले आहेत त्यासाठी त्याना योग्य जातीच्या बांबूची रोपे मिळण्यास येणाऱ्या अडचणी यावेळी विशद केल्या त्याना सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित कृषि अधिकाऱ्यांनी दिले. तसेच सौ. विमल म्हात्रे व महेश पाटील यांनी डुक्करांचा हैदोस आणि त्यामुळे होणारे शेती- पिकांचे नुकसान आदिबाबत काय उपयोजना शासनामार्फत करता येतील अशी विचारणा केली. या शिबिरात अनेक शेतकऱ्यांनी बांबु लागवड करण्याबाबतची सहमती दर्शविली आणि तत्संबंधी या कार्यशाळेत अर्ज वितरणाची सोय देखील करण्यात आली होती.
या कार्यशाळेस उपस्थित असणारे सर्व कृषि अधिकारी शेतकरी याचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष चिंतामण ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष वर्तक यांनी केले.



