मराठ्यांना जिंकवा किंवा मराठ्यांना हरवा पण मराठ्यांचा पुन्हा घात करू नका – पैगंबर शेख…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
“तुमचे उपकार मराठा समाज कधीच विसरणार नाही.आम्ही कायम तुमच्यासोबत ठामपणे उभे राहू” हे पहिल्यांदा मला कोण बोलले हे मलाही आता माहिती नाही.आपण केलेल्या अवाहनानंतर मराठा बांधवांचे शेकडो फोन मला आलेले आहेत जे अजूनपर्यंत सुरूच आहेत.मला वाटले हे फक्त फोन आणि कमेंट एवढ्या पुरते मर्यादित राहील पण आझाद मैदानावर जाताना पुणे स्टेशन पासून ते आझाद मैदान आणि पुन्हा पुण्यात येताना जेवढे आंदोलक भेटले त्यातील बहुतांश आंदोलकांनी या भावना डोळ्यात डोळे घालून आणि अगदी हात जोडून व्यक्त केल्या.मी त्यावेळी प्रचंड भावनिक झालो होतो. कारण ‘ही आपली माणसं आहेत’ त्या सर्वांच्या भावना आणि विश्वासाचा मी मनापासून आदर करतो आणि पुन्हा एकदा सांगतो “या महाराष्ट्रात मराठा समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर समाज म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या सोबत ठामपणे कायम उभा आहे.”

ही भूमिका आपण का घेतली ? मुस्लिम आणि मुस्लिमेतरांपैकी खूप जण म्हणत होते आपण यात बघ्याची भुमिका घेऊ.याशी आपला काहीही संबंध नाही. पण मला ते पटले नाही. कारण मराठा समाजाला एकटे पाडणे हा ‘अर्बन मनुवाद्यांच्या’ मोठ्या सामाजिक षडयंत्राचा भाग आहे हे मी जाणून आहे.गेल्या काही वर्षात या महाराष्ट्रात मराठा विरुद्ध धनगर,माळी,वंजारी,ओबीसी,मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण केला गेला आहे.हा संघर्ष एवढ्या टोकाला पोहोचवला गेला की एका ताटात जेवणारे एकमेकांची तोंडं पाहणे देखील बंद झाले.महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीवर याचे किती गंभीर पडसाद पडले याचा विचार आपण केलाय का ? हे कमी म्हणून की काय काही मराठा नेत्यांना अगदी सुपारी दिल्या सारखे मुस्लिम बांधवांवर वाट्टेल ते बोलण्यासाठी सोडले गेले.यातून मराठा आणि मुस्लिम यांच्यात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.काही मशिदी आणि दरगाह वर हल्ले होण्यात आणि दंगली घडण्यात या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे.हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.हे सर्व करवून घेण्यामागचा अर्बन मनुवाद्यांचा खरा उद्देश सफल झाला नाही तो भाग वेगळाच…
सांगा,मराठा समाजाच्या जवळ कुठला समाज ठेवला अर्बन मनुवाद्यांनी ? एकतर मनुवादी विचारधारा स्वीकारा,नाहीतर आम्ही तुमचे सामाजिक पानिपत करू.हा संदेश या माध्यमातून मराठा नेतृत्व आणि समाजाला दिला गेला आणि अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी होत असलेले मराठा बांधवांचे आंदोलन हा मराठा समाजा बाबतीतला खूप मोठा सामाजिक प्रयोग होता.या आंदोलनानंतर मराठा समाजा सोबत इतर कोणीही समाज नाही हे मराठा समाजाला दाखवले जाणार होते आणि हा प्रयत्न आपण पूर्णपणे नेस्तनाबूत केला याचा सार्थ अभिमान आहे. पण आता मराठा बांधवांची जबाबदारी देखील खूप वाढली आहे. हे सर्व चित्र तुमच्या समोर ठेऊन देखील आपण इतर समाजाला अजून तुटू देणार असू आणि स्वतःला एकटे पाडणार असू तर याला कोणीही थांबवू शकत नाही.महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज म्हणून,मोठा भाऊ म्हणून तुमची जबाबदारी आता सर्वांना जोडण्याची आहे.कोणी तोडा म्हणत असेल तर त्याला चपराक देण्याची धमक देखील तुम्हाला दाखवावी लागेल.जेवढी शक्ती,वेळ,पैसा आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही घालवत आहात.त्यातील ३० ते ४० टक्के शक्ती,वेळ आणि पैसा फक्त इतर सर्व समाज जोडण्यासाठी खर्ची करावा लागेल.या महाराष्ट्रातील १८ पगड जाती आणि सर्वधर्मीय समाज तुमच्या सोबत राहील अशी मला खात्री आहे. हा सोशल इंजिनिअरिंगचा महामेरू मोठा भाऊ म्हणून आता तुम्हाला उचलावा लागेल.

मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयावरून ही व्यवस्था किती वेळा मूर्खात काढणार आहे…?२०१४,२०१८,२०२४ असे आत्तापर्यंत तीन वेळा आरक्षण देऊन पुन्हा रद्द करून नक्की काय साध्य झाले ? याचा विचार सर्वच नेत्यांनी आणि पक्षांनी करायला हवा.त्यामुळेच मला असे म्हणावे लागत आहे “मराठ्यांना जिंकवा किंवा मराठ्यांना हरवा पण मराठ्यांचा पुन्हा घात करू नका” काय तो निर्णय एकदाचा देऊन टाका.३ वेळा मराठा समाजाचा घात झालेला आहे.आता त्याच गोष्टी पुन्हा करू नका.आरक्षणाविषयी सरकार,विरोधी पक्ष,आरक्षणाचे समर्थक,विरोधक या सर्वांचा नीटपणे संवाद घडवून हा मुद्दा कायमचा मार्गी लावावा लागेल.कारण मराठा समाजाने किती वर्षे याच मुद्द्यावर आता आंदोलने करायची ? प्रत्येक आंदोलना वेळी मराठा समाजातून आत्महत्या होतात. त्याची जबाबदारी कोण घेणार ? आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमीत आरक्षणासाठी आत्महत्या होते ही बाब चांगली आहे का ? विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सामाजिक न्याय दिला त्या भूमीत आरक्षणासाठी आत्महत्या होते ही बाब भूषणावह आहे का ? याचा विचार आता सर्वांनीच करावा लागेल आणि एकत्र येऊन हे आरक्षणाचे विषय मार्गी लावावे लागतील.

आझाद मैदानावर असलेल्या मराठा आंदोलकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची खूप शक्यता आहे.कारण तिथे असलेली टॉयलेट सुविधा अपुरी आहे,पाऊस आणि अस्वच्छता याने आंदोलकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत वारी आणि गणपतीमध्ये ज्या पद्धतीने महापालिका स्वच्छता करते त्या पद्धतीने करावी लागेल,नाहीतर यात काही बदल होईल असे वाटत नाही.सरकार याची दखल घेईल ही अपेक्षा आहे.माझ्या आंदोलक मराठा बांधवांना माझी विनंती आहे.तुम्ही संयम बाळगला आहे, तो तसाच बाळगुण ठेवा.तुम्ही हिंसक झालात तर आंदोलन दडपणे अतिशय सोपे होणार आहे.त्यासाठी गांधीवाद हाच उपाय आहे.आपल्याकडून काही चुकीचे होणार नाही आणि त्याचे भांडवल केले जाणार नाही याची आपण काळजी घ्याल हा विश्वास आहे.
तुम्ही आझाद मैदानावर आणि एकूण प्रवासात जे प्रेम दिले,जी आपुलकी आणि ऋणानुबंध दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.मी सांगितलेल्या गोष्टींचा आपण सकारात्मक पद्धतीने विचार करून माणसे जोडालं ही अपेक्षा आहे शेवटी माणसं जोडली पाहिजे
पैगंबर शेख,पुणे
9970070705
जय जिजाऊ,जय शिवराय,जय संविधान,जय भीम…



