महाराष्ट्र

आमदार संजय मामा शिंदे यांनी रावगाव सब स्टेशनच्या मंजुरी बाबत जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा प्रत्यक्षात काय काम केले ते सांगावे,माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आमदार संजयमामा शिंदे यांचे २४ मे २०२१ रोजीचे पत्रच त्यांचा रावगाव सबस्टेशनच्या मंजूरीबाबतचा दावा खोडून काढत असून आता जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा प्रत्यक्षात याबाबत काय काम केले हे त्यांनी सांगावे असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. रावगाव ता. करमाळा येथील ३३/११ के व्ही क्षमतेच्या सबस्टेशनची अजूनही उभारणी झाली नसुन केवळ भुमिपुजन करण्यात आले आहे.

याबाबत विद्यमान आमदार यांचेकडून मात्र यास आपण मंजूरी आणल्याचा दावा केला होता. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांनी आज पुराव्यानिशी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की दिनांक २४ मे २०२१ रोजी आमदार संजयमामा शिंदे यांनी (जाक्र एके/४५०./२१) अधिक्षक अभियंता (महावितरण सोलापूर) यांना एक पत्र पाठवले आहे.

यात विद्यमान आमदार महोदय लिहतात कि माझे मतदार संघातील मौजे रावगाव येथे सन २०१८ साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ३३/११ के व्ही नवीन सबस्टेशन मंजूर झाले होते.परंतु त्यावेळी जागा उपलब्ध नसल्याने सबस्टेशन रद्द झाले. आता जागा उपलब्ध झाल्याने नवीन आराखड्यात याचा समावेश करावा असा आशय या पत्रात आहे. याद्वारे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी कबुल केले की २०१८ साली तत्कालीन आमदार म्हणुन नारायण पाटील यांनी यास मंजुरी मिळवून दिली.

आणि मग दुसरीकडे मात्र माजी आमदार नारायण पाटील यांनी रावगाव सबस्टेशनच्या बाबतीत काहीही पाठपुरावा केला नसुन केवळ आपल्यामुळेच या कामास मंजुरी मिळाली असे सांगून जनतेची दिशाभूल केली. वास्तविक पाहता हे सबस्टेशनची मंजुरी कायम राहीली असुन ती रद्द झालीच नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे या सबस्टेशनला आपल्या काळात जागाही उपलब्ध करून देण्यात आपण पुढाकार घेतला व त्यानुसार महावितरण आणि संबंधित जागामालक यांच्यामध्ये लेखी करारनामा सुध्दा करण्यात आला.

त्याची एक प्रत आजही आपल्याकडे उपलब्ध आहे. पुढे काही तांत्रीक बाबींची सोडवणुक करताना हे काम महावितरण कडुन कासवगतीने करण्यात आले आणि अशातच निवडणुक येऊन सत्तांतर झाले. आज विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी या पाच वर्षात या सबस्टेशनचे उर्वरित काम पुर्ण करायला हवे होते. परंतू या कामाचे श्रेय मला मिळेल या दुषित भावनेने आमदार महोदयांनी हे काम जाणीवपूर्वक रखडले. यामुळे आज रावगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना वीजेच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

एकीकडे लेखी स्वरूपात शासनाकडे मागणी करताना सन २०१८ च्या मंजूरीचा उल्लेख करायचा आणि नंतर जनतेसमोर मात्र आपण नव्याने हे काम करत आहोत असे दाखवायचे हा आमदार पदाला न शोभणारा प्रकार असुन आज नाईलाजाने आपणास ही बाब जनतेसमोर उघडकीस करावी लागली. आमच्यासाठी हे काम किमान या पाच वर्षात तरी पुर्ण होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा एवढाच शुध्द हेतू मनात होता.

परंतु कायमच आयत्या पीठावर रेघोट्या ओढून जनतेची दिशाभूल करण्याची विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांची पध्दत करमाळा तालूक्याच्या विकासाला बाधक असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच पाच वर्षात रावगाव येथील सबस्टेशनची उभारणी पूर्ण करु न‌ शकल्याने आमदार म्हणुन या परिसरातील शेतकऱ्यांची त्यांनी माफी मागावी.

कोणत्या तोंडाने सन २०१४ ते २०१९ दरम्यान झालेल्या कामाचा हिशोब विद्यमान आमदार मागत आहेत याचे आश्चर्य वाटत असून‌ माझ्या कालावधी मधील‌ विकासकामे ठळकपणे दिसत आहेत.तरीही रावगावसह माझ्या कालावधी मधील वीजेच्या कामाचे सर्व‌ पुरावे आमच्याकडे असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button