पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपामध्ये प्रवेश

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघरचे शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित पुन्हा आपल्या मुळ पक्ष असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील हजर होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारीला मुकावे लागले.
या सर्व घडामोडींमुळे गावित नाराज असल्याच्या चर्चा होत्या.आता त्यांनी भाजपात प्रवेश करून आपली नाराजी प्रकट केल्याचे बोलले जात आहे. यंदा भाजपने जागावाटपात पालघरची जागा आपल्याकडे खेचत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ.हेमंत सावरा यांना मैदानात उतरवले आहे.सवरा हे भाजपचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र असून त्यांचे २०२० मध्ये निधन झाले होते.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झाल्याचे पहायला मिळाले आहे. आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना आणि नंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी भाजपबरोबर आल्याने लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला.या सर्व घडामोडीत महायुतीतील पक्षांना आपल्या काही हक्कांच्या जागांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे त्या-त्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.